९६,६०१ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 11:23 PM2017-10-15T23:23:23+5:302017-10-15T23:24:15+5:30
डिसेंबर महिन्यात मुदत संपणार असलेल्या ८६ ग्रामपंचायतीकरिता सोमवारी मतदान होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : डिसेंबर महिन्यात मुदत संपणार असलेल्या ८६ ग्रामपंचायतीकरिता सोमवारी मतदान होणार आहे. याकरिता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीत एकूण ९६ हजार ६०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात ४४ हजार २०८ महिला आणि ५० हजार ३८९ पुरूष मतदारांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त चार अन्य मतदारांचा समावेश आहे.
मतदानाच्या कार्यक्रमाला सकाळी ७ वाजता प्रारंभ होणार आहे. निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीत एकूण २७६ केंद्र तयार करण्यात आले आहे. या केंद्रांवर प्रत्येकी चार म्हणजेच एकूण १ हजार ११२ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून होणाºया प्रत्येक घडामोडीवर लक्ष राहणार आहे. मतदानाच्या काळात कुठलीही गडबड होणार नाही याची दक्षता घेण्याकरिता जिल्हाधिकाºयांनी थेट कलम ३६ जारी केली आहे. शिवाय पोलीस विभागाच्यावतीनेही बंदोबस्त लावण्यात आला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस आणि एक गृहरक्षक देण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. शिवाय पोलिसांचे एक विशेष पथक फिरत राहणार असून दंगल नियंत्रण पथकासही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात यापूर्वी ११२ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार होती. मात्र सेलू तालुक्यात काही उमेदवारांना पतंग चिन्ह देण्यात आल्याने गडबड झाली. यामुळे तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीकरिता नवा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कार्यक्रमानुसार येथे २३ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने उमेदवार चिंतेत सापडले आहेत.
सरपंचपदाकरिता एकूण ३०२ उमेदवार
होत असलेल्या निवडणुकीत पाच ग्रामपंचायती अविरोध ठरल्या तरी सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता चांगलीच चुरस असल्याचे दिसून आले आहे. एकूण ३०२ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी कितींच्या गळ्यात विजयाची माळ पडते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
पाच ग्रामपंचायती ठरल्या अविरोध
जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतीने सरपंच पदासह सदस्याचीही बिनविरोध निवडणूक करून एक आदर्श निर्माण केला आहे. वर्धा तालुक्यातील पांढरकवडा (गणेशपूर) या ग्रामपंचायतीतील सरपंचासह सातही सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जऊळगाव व झाडगाव येथील प्रत्येकी एका सदस्याची बिनविरोध निवड झाली आहे. आष्टी तालुक्यातील १ सरपंच व १३ सदस्य, कारंजा तालुक्यातील २ सरपंच व ४८ सदस्य तर आर्वी तालुक्यातील १ सरपंच व ३५ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. एकंदरीत पाच ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या ५ व १९२ उमेदवारांची निवड बिनविरोध निवड झाली आहे.
२७८ बॅलेट कंट्रोल, ५५६ बॅलेट युनिट
८६ गावांत होत असलेल्या या निवडणुकीत प्रशासनाची व्यवस्था पूर्ण झाली आहे. मतदानाकरिता २७८ कंट्रोल युनिट आणि ५५६ बॅलेट युनिट सज्ज करण्यात आले आहे. या माध्यमातून ही निवडणूक पार पडणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्यावतीने सांगण्यात देण्यात आली आहे.