भाजपा-शिवसेनेचे सरकार खोटारडे व निष्क्रिय, हल्लाबोल पदयात्रेत अजित पवारांची सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 04:19 PM2017-12-04T16:19:50+5:302017-12-04T18:10:16+5:30
राज्यातील भाजपा-शिवसेनेचे सरकार खोटारडे व निष्क्रिय सरकार आहे. या सरकारच्या विरोधात कॉँग्रेससह समविचारी पक्षांना एकत्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी विधानसभेत घेरणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
दापोरी (वर्धा) - राज्यातील भाजपा-शिवसेनेचे सरकार खोटारडे व निष्क्रिय सरकार आहे. या सरकारच्या विरोधात कॉँग्रेससह समविचारी पक्षांना एकत्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी विधानसभेत घेरणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. हल्लाबोल पदयात्रेचे वर्धा जिल्ह्यात आगमण झाल्यानंतर सोमवारी दापोरी शिवारात गावात पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात एवढे खोटारडे सरकार आतापर्यंत झाले नाही. निवडणुकीच्या वेळी लोकांना दिलेले एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. निवडणुका नाही म्हणून आता शेतक-यांना कोणतीही मदत दिली जात नाही. शेतक-यांच्या प्रश्नांकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ८९ लाख शेतक-यांचे ३५ हजार कोटीचे कर्ज माफ करू, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु एकाही शेतक-याच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे आलेले नाही.
मागील तीन वर्षात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पुर्णपणे ढासळली आहे. देशातील पाच शहरांच्या क्राईम रेशोमध्ये महाराष्ट्रातील तीन शहर आहे. मागील तीन वर्षात महाराष्ट्रात एकही नवा उद्योग आला नाही. आम्ही १९६० पासून राज्य चालविले. त्यावेळी राज्यावर २ लाख ९६ हजार कोटी रूपयांचे कर्ज होते. या सरकारने आता हे कर्ज ४ लाख ५० हजार कोटीवर नेवून ठेवली आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
समाजातला कोणताच घटक या सरकारच्या कामकाजावर समाधानी नाही. शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी पैसा उभा करण्याकरिता प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन विकास आराखड्यात ३० टक्के कपात करण्यात येत आहे. किटकनाशकाच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात ३० शेतक-यांच्या मृत्यू झाला. बी.टी कापसाच्या बियाणांवर संशोधनाचे काम आघाडी सरकारच्या काळात सुरू झाले होते. मात्र या सरकारच्या काळात हे काम ठप्प झाले. एकाही शेतमालाला हमी भाव या सरकारने दिलेला नाही. त्यामुळे या सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येत आहे. व १२ डिसेंबरला राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या नेतृत्वात सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले जाणार आहे, असे अजीत पवार यांनी सांगितले. शेतक-यांच्या कापसाला बोनस जाहिर केला पाहिजे व कोणत्या शेतक-याच्या खात्यावर किती रक्कम कर्जमाफीची जमा झाली. याची माहिती विधीमंडळात सरकारला मागणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
विदर्भावर अधिक लक्ष देणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात विदर्भातून सर्वात कमी जागा मिळतात. आमच्याविषयी भाजपवाल्यांनी हे पश्चिम महाराष्ट्राकडे निधी पळवितात, अशी प्रतिमा तयार करून ठेवली आहे व तसा आरोप केला जातो. ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी आगामी काळात विदर्भावर अधिक लक्ष आम्ही केंद्रीत करणार असल्याचे अजीत पवार यांनी स्पष्ट केले.