मागेल त्याला शेततळे योजना लक्ष्यांकापासून दूरच
By admin | Published: May 23, 2017 01:05 AM2017-05-23T01:05:18+5:302017-05-23T01:05:18+5:30
शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा प्राप्त व्हावी म्हणून राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे योजना अंमलात आणली. कृषी विभागामार्फत ती सक्तीने राबविली गेली;
केवळ २८६ शेततळे : जिल्ह्याला दिले होते ३२०० शेततळ्यांचे उद्दिष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा प्राप्त व्हावी म्हणून राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे योजना अंमलात आणली. कृषी विभागामार्फत ती सक्तीने राबविली गेली; पण प्रारंभी शेतकऱ्यांचा प्रतिसादच मिळत नव्हता. यामुळे वर्धा जिल्हा लक्ष्यांकापासून दूर आहे. ३ हजार २०० शेततळ्यांचे उद्दिष्ट असताना जिल्ह्यात एप्रिल अखेरपर्यंत ३०० वर शेततळे पूर्ण झाले.
कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेत वर्धा जिल्ह्याला ३ हजार २०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. दीड वर्षांपूर्वी सुरू झालेली योजना जाचक अटींमुळे शेतकऱ्यांच्या पचनी पडली नाही. केवळ ५० हजार रुपयांच्या अनुदानात सदर शेततळ्यांचे काम करायचे होते. परिणामी, लक्ष्य गाठताना कृषी विभागाला श्रम घ्यावे लागत आहेत. कृषी विभागाच्या पुढाकारामुळे जिल्ह्यात २० एप्रिलपर्यंत २८६ शेततळ्यांचे काम पूर्ण करण्यात आले. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत हा आकडा ३०० वर गेला आहे. शिवाय सुमारे १५० वर शेततळ्यांची कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.
मागेल त्याला शेततळे योजनेत जिल्ह्यातील २ हजार ४८० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यासाठी लागणारे सेवाशुल्क शेतकऱ्यांनी अदा केले आहे. हे सर्व प्रस्ताव निकाली निघाल्यास कृषी विभागाला उद्दिष्टाप्रत पोहोचता येणार आहे. जययुक्त शिवार अभियानातील कंत्राटदारांकडून शेततळ्यांची कामे करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
गैरप्रकार टाळण्याची गरज
शेततळे योजनेत कंत्राटदारांकडून गैरप्रकार केले जात आहेत. तळ्यांच्या मोजमापात निकष डावलले जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. खोलीकरणातून निघालेल्या माती, मुरूमाच्या ढिगाऱ्यावरून तळ्याची खोली मोजली जात असल्याच्या तक्रारी आहे. हा प्रकार कृषी सहायकही करीत असल्याची ओरड होत आहे. कृषी विभागातील वरिष्ठांनी या प्रकारांवर आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागेल त्याला शेततळे योजनेला आता बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी स्वत:हुन शेततळ्यांची मागणी करीत आहे. ३०० वर तळे पूर्ण झाले असून १५० वर कामे सुरू आहेत. उर्वरित कामेही लवकरच हाती घेतली जातील. उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.