सरकारला जागे करण्यासाठी हल्लाबोल पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:28 PM2017-12-06T23:28:21+5:302017-12-06T23:28:42+5:30
कधी नव्हे ते विदर्भात किटकशाकांच्या फवारणीने ४० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शेतकरी आत्महत्या सतत वाढत आहे; पण सरसकट कर्जमाफी सरकारने दिलेली नाही.
आॅनलाईन लोकमत
सेवाग्राम : कधी नव्हे ते विदर्भात किटकशाकांच्या फवारणीने ४० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शेतकरी आत्महत्या सतत वाढत आहे; पण सरसकट कर्जमाफी सरकारने दिलेली नाही. एकाही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आले नाही. सरकारकडून शेतकरी व जनतेची फसवणूक झाली आहे. या सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाने विदर्भातून हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे. नागपूर अधिवेशनात सरकारला जागं करण्याचं काम आम्ही करू, असे जाहीर आश्वासन राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी दिले.
सेवाग्राम येथे हल्लाबोल पदयात्रा पोहोचल्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. हल्लाबोल पदयात्रा सेवाग्राम मेडिकल चौकात आली. सभेपूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या प्रतिमेला आ. तटकरे, खा. सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींनी हारार्पण केले.
व्यासपीठावर आ. जयंत पाटील, जयदेव गायकवाड, राजेश टोपे, गुलाबराव देवकर, ख्वाजा बेग, हसन ुमुश्रीफ, चित्रा वाघ, विद्या चव्हाण, चंद्रकांत पाटील, माजी आमदार गुलाबराव गावंडे, प्रा. सुरेश देशमुख, राजू तिमांडे, किशोर माथनकर, अॅड. सुधीर कोठारी, शरद देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, संदीप काळे आदी उपस्थित होते.
तटकरे पूढे म्हणाले की, शरद पवार कृषीमंत्री असताना कृषी क्रांती घडवून आणण्याचे काम केले. कर्जमाफीसह शेतकरीहिताचे निर्णय त्यांनी घेतले. या महाराष्ट्राला सक्षम नेतृत्व दिले. आज डॉ. बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन असून त्यांनी या देशाला समानता आधारित लोकशाही दिली; पण धर्माचे राजकारण करणाºया सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीच धोक्यात आणल्याचा आरोप करीत सरकारला घेरण्यासाठी हल्लाबोल आंदोलनाची तिव्रता वाढली पाहिजे, असे सांगितले.
आ. गायकवाड यांनी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी देशाचे संविधान तयार व्हावे यासाठी जबाबदारी देण्याची वेळ आली तेव्हा गांधीजींनी बाबासाहेबांचे नाव सुचविले. त्यांनी देशाला सक्षम व प्रभावी लोकशाही निर्माण करणारी व लोकांचे राज्य व्हावे यासाठी राज्य घटना लिहून काढली. उद्देशिका समजावून घेतली तर या सरकारने गुजरातमध्ये एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही. विदर्भात हल्लाबोल पदयात्रा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. सुरेश देशमुख म्हणाले की, माझा जन्म या भूमीत झाला असून येथे महात्मा गांधीजींचे वास्तव्य राहिले आहे; पण विकास झाला नाही. या सरकारच्या आश्वासन व धोरणामुळे शेतकऱ्यात निराशा पसरली आहे. त्यांना आश्वस्त करणे गरजेचे आहे.
सभेचे संचालन समीर देशमुख यांनी केले. यावेळी पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
धनंजय मुंडेंना आडवा आला प्रोटोकॉल
विरोधी पक्षेनेते धनंजय मुंडे यांना बोलण्यास आग्रह करण्यात आला; पण पक्षाच्या अध्यक्षाचे भाषण झाल्यानंतर बोलण्याचा प्रोटोकॉल नाही, असे त्यांनी सांगितले. यामुळे त्यांना सभेला मार्गदर्शन करता आले नाही. राष्ट्रवादी काँगे्रसची ही पदयात्रा गुरूवारी सकाळी ९ वाजता महात्मा गांधी आश्रम येथून निघून पवनारकडे रवाना होणार आहे. रात्री सेलू येथे यात्रेचा मुक्काम राहणार आहे.