स्वच्छ शहराला पालिकेचा कोलदांडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 10:25 PM2018-05-14T22:25:53+5:302018-05-14T22:25:53+5:30
स्वच्छ शहर, सुंदर शहर असा गाजावाजा करीत स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या पुलगाव पालिकेने शहरातील अंतर्गत स्वच्छतेला कोलदांडा दिल्याचेच दिसते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्वच्छ शहर, सुंदर शहर असा गाजावाजा करीत स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या पुलगाव पालिकेने शहरातील अंतर्गत स्वच्छतेला कोलदांडा दिल्याचेच दिसते. शहरातील नाल्या तुंबल्या असून विकास कामेही ठप्पच आहे. पुलगाव नगर पालिका मात्र या सर्वांकडे दुर्लक्ष करीत असून पदाधिकारी अंतर्गत राजकारणात मशगुल असल्याचे दिसते. परिणामी, नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून सार्वजनिक आरोग्यही धोक्यात आले आहे.
भाजपाने जवळपास सर्वच नगर पालिका, नगर पंचायतींमध्ये एकहाती सत्ता मिळविली. केंद्र, राज्य तथा पालिकेमध्ये भाजपाची सत्ता असल्याने शहराचा चांगला विकास होईल, अशी पुलगावकरांची अपेक्षा होती; पण या अपेक्षेचा काही दिवसांतच भंग झाल्याचे पाहावयास मिळत आहे. शहरातील सांडपाणी वाहून नेणारा मुख्य नाला अनेक ठिकाणी गाळाने व कचºयाने तुंबला आहे. सांडपाणी तुंबल्याने हरिरामनगर, शनि मंदिर परिसर, आठवडी बाजार, सुभाष नगर परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मुख्य नाल्यामध्ये हरिरामनगर परिसरात बेशरम वाढली असून अनेक ठिकाणी नाला अरूंद झाला आहे. या नाल्यावर काहींनी अतिक्रमणही केले आहे. यामुळे सांडपाणी अडले असून नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. मुख्य मार्गावर या नाल्यावर असलेल्या पुलाजवळ सर्वत्र कचरा साचला आहे. यामुळे सांडपाणी वाहून जात नाही. याचा त्रास त्या भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. वास्तविक, या नाल्यावर एकाच ठिकाणी दोन पूल असल्याने त्याची वारंवार साफसफाई करणे गरजेचे आहे; पण तसे होताना दिसत नाही. वर्षभरातून एखाद वेळाच हा नाला साफ केला जातो. ही कामे करीत असतानाही कुचराई केली जाते.
शहरातील अंतर्गत स्वच्छतेकडेही पुलगाव नगर पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळे नगर पालिकेच्या इमारतीशेजारीच कचºयाचे ढिगारे दिसून येतात. या भागातून जाताना नाकाला रूमाल लावूनच जावे लागते. रेल्वे स्थानक चौक ते नाचणगाव मार्गावर अनेक ठिकाणी कचºयाचे ढिगारे दिसून येतात. शिवाय रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेचा लघुशंकेसाठी वापर होत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. या परिसरात अनेक हॉटेल, दुकाने असून त्यांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनसाठी रस्ते खोदण्यात आले; पण ते व्यवस्थित बुजविले नाहीत. परिणामी, शहरातील रस्त्यांची पूरती वाट लागली आहे.
यासह अनेक समस्या शहरात सामान्य नागरिकांना दिसतात; पण विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या पुलगाव पालिका प्रशासनाला दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. किंबहुना, पुलगाव पालिकेतील पदाधिकाऱ्यांचे या समस्यांकडे लक्षच नसून ते अंतर्गत राजकारणात व्यस्त असल्याचा आरोपही सामान्यांतून केला जात आहे.
घंटागाड्यांवरील खर्च व्यर्थ, कचरा शेवटी उकिरड्यावरच
पुलगाव नगर पालिकेकडे सहा घंटागाड्या आहेत. या गाड्यांच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डातील कचरा गोळा करून तो डम्पिंग ग्राऊंडवर नेऊन टाकणे अपेक्षित होते; पण मागील सहा महिन्यांपासून त्या नागरिकांच्या दृष्टीस पडतच नाहीत. काही दिवसांपूर्वी याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर काही दिवस गाड्या वॉर्डात दिसून येत होत्या; पण पुन्हा त्या एकाच जागेवर दिसून येतात. एक सर्कस ग्राऊंडवर, दुसरी भलतीकडेच तर अन्य गाड्या दुरूस्तीसाठी नेल्याचे सांगितले जाते. या सर्व प्रकारामुळे प्रत्येकच वॉर्डात कचºयाचे उकिरडे तयार झाल्याचे दृश्य आहे. नगराध्यक्ष तथा सत्ताधारी पक्षातील नगरसेवकही दुर्लक्ष करीत असल्याने शहराचा एकूण विकास खुंटला आहे. या सर्व प्रकारांकडे भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी तथा नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.
चार महिन्यांत बैठकही नाही
नगर पालिका प्रशासनाने पदाधिकाऱ्यांची नियमित बैठक घेणे बंधनकारक आहे; पण पुलगाव नगर पालिकेत मागील चार महिन्यांपासून सर्वसाधारण समितीची सभाही झाली नसल्याचे तथा दोन वर्षांत कुठलीही नवीन कामे काढली नसल्याची ओरड विरोधी पक्षातील नगर सेवकांतून करण्यात येत आहे.