वन्यप्राण्यांच्या धुमाकुळाने कपाशीचे पीक उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 10:52 PM2017-11-18T22:52:01+5:302017-11-18T22:52:22+5:30
पवनूर शिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला आहे. वन्य प्राणी शेतात धुमाकूळ घालत असून शेतकºयांच्या हाती येणाऱ्या पिकावरही पाणी फेरले जात आहे.
आॅनलाईन लोकमत
आंजी (मोठी) : पवनूर शिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला आहे. वन्य प्राणी शेतात धुमाकूळ घालत असून शेतकºयांच्या हाती येणाऱ्या पिकावरही पाणी फेरले जात आहे. परिणामी, शेतकरी हवालदिल झाले आहेत. वन विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
पवनूर येथील लक्ष्मण कोंडलकर यांच्या शेतातील दहा एकरातील कपाशीचे पीक वन्यप्राण्यांनी उद्ध्वस्त केले. यात त्यांचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले, असा अंदाज शेतकºयाने व्यक्त केला. चांगल्या अवस्थेत असणारे कपाशीचे पीक ऐनवेळी वन्यप्राण्याने उद्ध्वस्त केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वनरक्षक एन.पी. जाधव यांनी पाहणी केली असून वरिष्ठांना कळविले आहे. यापूर्र्वीही पवनूर शिवारात श्वापदांनी मोठ्या प्रमाणात शेतपिकाचे नुकसान केले होते. वनविभागाच्यावतीने पंचनामे करण्यात आले होते; पण मिळणारी मदत ही अत्यल्प असल्याने त्यातून नुकसानाची भरपाई होत नाही. यामुळे वनविभागाने कुंपणासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी पवनूर येथील शेतकऱ्यानी केली होती. या मागणीचाही शासन दरबारी विचार करण्यात आला नाही. आता पुन्हा वन्य प्राण्यांची हैदोस घातला आहे. असाच हैदोस सुरू राहिला तर शेतकऱ्यांना उत्पादनच होणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
डुकरांनी केले पीक भुईसपाट
पिंपळखुटा : सुकळी (उबार) येथील महिला शेतकरी चंद्रकला गोड्डे यांच्या शेतातील डुकरांनी कपाशीचे पीक पूर्णत: भुईसपाट केले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर जगण्या-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकसानीची माहिती वनविभागाला दिली असून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. यात तलाठी काही महत्त्वाची कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करीत असल्यने नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा अद्याप होऊ शकलेला नाही. यावर्षी कापूस पिकाला मोठा खर्च आला असून बाजारभाव अल्प आहे. यामुळे यंदाचे कापूस पीक तोट्यात आहे. त्यातच हाताशी आलेले पीक जंगली श्वापदे नष्ट करीत आहेत. यामुळे शेतकरी हतबल असून नुकसानीच्या भरपाईकरिता शेतकऱ्याने वन विभागाला साकडे घातले आहे. वन विभागाने पंचनामे करून पिडीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.