आठ वर्षाच्या सोनालीला शाळेत प्रवेश नाकारला; म्हणे जन्माचा दाखला आणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 11:40 AM2019-02-06T11:40:03+5:302019-02-06T11:43:14+5:30
जिल्ह्यात असलेल्या आकोली येथील गोसावी समाजाच्या सोनाली रवी माईंदे या आठ वर्षांच्या बालिकेला जन्माचा दाखला नाही म्हणून जिल्हा परिषद शाळेने प्रवेशच नाकारल्याचे मुलीच्या वडिलांनी लोकमतला सांगितले.
अरविंद काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जिल्ह्यात असलेल्या आकोली येथील गोसावी समाजाच्या सोनाली रवी माईंदे या आठ वर्षांच्या बालिकेला जन्माचा दाखला नाही म्हणून जिल्हा परिषद शाळेने प्रवेशच नाकारल्याचे मुलीच्या वडिलांनी लोकमतला सांगितले.
गावकुसाबाहेर राहणारा भटका समाज आजही उपेक्षेचे जिणं जगत आहे. त्यांची विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची वाट अंधारलेली असल्याचे वास्तव आहे. सोनाली ही गोसावी या भटक्या समाजाची मुलगी आहे. गोसावी समाज हा मनेरी, औषधे, प्रसाधने विकून आपला उदरनिर्वाह करतो. त्यामुळे भटकंती ही त्यांच्या पाचवीलाच पुजली आहे. तिचाही जन्म असाच भटकंतीत झाला त्यामुळे तिच्या जन्माचा पुरावा उपलब्ध नाही.
सोनालीचे वडिल रवी हे तिला सोबत घेऊन अनेकदा शाळेत नाव दाखल करायला घेऊन गेले पण जन्माचा दाखला आणा तरच शाळेत प्रवेश देऊ अशी भूमिका शाळा प्रशासनाने घेतली. शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्वांना शिक्षण मिळणे बंधनकारक असतांनी ही कायद्याची पायमल्ली आहे.
आकोली गावात अशा कितीतरी सोनाली शिक्षणापासून जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्या मुलीचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेणाऱ्यांवर कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.
माझा मनेरीचा व्यवसाय आहे. त्यासाठी भटकंती करावी लागते. अशाच भटकंतीत तिचा जन्म झाला त्यामुळे जन्माचा पुरावा नाही. मी तिला शाळेत घेऊन गेलो होतो पण दाखल आणल्याशिवाय शाळेत प्रवेश देता येणार नाही असे सांगितले.
रवी माईंदे
गोसावीनगर आकोली.
जर एखाद्या मुलाचा जन्माचा दाखला उपलब्ध नसेल तर पालकाचे पाल्याच्या जन्मतारखेबाबत शपथपत्र घेऊन नाव दाखल करता येते. शिक्षणापासून कुणालाही वंचित ठेवता येत नाही. शपथपत्रात दिलेली तारीख हीच खरी आहे असे शपथपत्रात नमुद असावे. शिक्षण घेणे हा त्यांचा हक्क असून याबाबत मी माहिती घेते .
रेखा बावणे
केंद्र प्रमुख जामनी