शेतकºयांना पायी चालणे कठीण : जीव धोक्यात टाकून जावे लागते शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:09 AM2017-10-11T01:09:52+5:302017-10-11T01:10:35+5:30

चंदेवाणी ते सेलगाव पांदण रस्त्यावर अवकळा आली आहे. शिवाय नदीवर पूल नसल्याने शेतकरी पाण्यातून वाट काढून शेतात जातात.

Farmers are not able to walk on foot; | शेतकºयांना पायी चालणे कठीण : जीव धोक्यात टाकून जावे लागते शेतात

शेतकºयांना पायी चालणे कठीण : जीव धोक्यात टाकून जावे लागते शेतात

Next
ठळक मुद्दे चंदेवाणी-सेलगाव पांदणीची दुरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : चंदेवाणी ते सेलगाव पांदण रस्त्यावर अवकळा आली आहे. शिवाय नदीवर पूल नसल्याने शेतकरी पाण्यातून वाट काढून शेतात जातात. परिणामी, त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन वेळा पांदण रस्ता व पुलासाठी पाहणी झाली; पण अद्याप मुहूर्त गवसला नाही. यामुळे आजही चंदेवाणी येथील शेतकºयांना यातना सहन कराव्या लागत आहेत.
चंदेवाणी हे मुख्य व्यवसाय शेती असलेले गाव आहे. येथील ६० ते ७० शेतकºयांची शेती सेलगाव शिवारात आहे. शेतात जायचे असल्यास एका अरूंद पांदण रस्त्याने जावे लागते. या चंदेवाणी-सेलगाव पांदण रस्त्यावर मोठे दगड आहेत. पावसाळ्यात चिखल व पाणी साचते. बैलबंडी तर सोडा पायी चालणेही कठीण आहे. या पांदण रस्त्याने एक किमी अंतर पूढे जाताच लहान नदी आहे. या नदीवर रपटाही बांधण्यात आलेला नाही. यामुळे अनेक वर्षांपासून शेतकºयांना शेतात जाताना कंबरभर पाण्यातून जीव मुठीत घेऊन जावे लागते. ही नदी पार करताना महिलांना तर तारेवरची कसरत करावी लागते. यात अनेक अपघातही झाले आहेत.
याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा ग्रा.पं.मध्ये ठराव घेऊन लेखी प्रस्ताव शासनाकडे पाठविला; पण या समस्येला शासनाने केराची टोपली दाखविली. दोन वेळा पांदण रस्ता व पुलाच्या बांधकामासाठी मोजमाप झाले; पण पांदण रस्ता व पूल बांधण्याचा मुहूर्त निघाला नाही. हा पांदण रस्ता अत्यंत खराब असल्याने शेतकºयांना शेतमाल सुरक्षित घरी आणता येत नाही. हा दोन किमी पांदण रस्ता झाला तर चंदेवाणी येथील नागरिकांना सेलगाव मार्गे काटोल मार्केटला आपला शेतमाल विक्रीस नेता येईल. गावातील विद्यार्थ्यांना काटोल येथे उच्च शिक्षणासाठी जाता येईल. या पांदण रस्त्याने काटोल शहराचे अंतर कमी आहे. यामुळे काटोलला जाण्याचा वेळ व त्रास वाचणार असून गावाचा विकास साधला जाणार आहे.
ग्रा.पं. भवन लोकार्पण सोहळ्यात चंदेवाणी येथील ग्रामस्थांनी पांदण रस्त्याची स्थिती व नदीवरील पुलाची गरज विद्यमान आमदारांच्या लक्षात आणून दिली. त्यांना पांदण रस्त्याने चालणेही कठीण झाले होते. मग, वर्षभर या रस्त्याने शेतकरी कसे जात असतील, याची कल्पना न केलेली बरी. आमदारांनी या रस्त्याची दुरवस्था पाहिल्यानंतर शासनाकडे पाठपुरावा करून रस्ता व पूल बांधून देण्याची ग्वाही दिली. यामुळे ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

स्मशानभूमी नसल्याने अंतिम संस्कारातही येतात अडचणी
चंदेवाणी या गावात स्मशानभूमीदेखील नाही. यामुळे नागरिकांना मृतदेहावर अंतिम संस्कार करतानाही अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात तर प्रेतांना अग्नि देताना कसरतच करावी लागते. आकाशाच्या छताखाली भर पावसात मृतदेहांना अग्नि द्यावा लागतो. या प्रकारामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतो. लोकप्रतिनिधी तथा प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. स्मशान भूमी व शेड नसणे ही लाजीरवाणीच बाब आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Farmers are not able to walk on foot;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.