अखेर ग्रामपंचायतीने खुले केले विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्र
By admin | Published: July 13, 2017 01:00 AM2017-07-13T01:00:58+5:302017-07-13T01:00:58+5:30
ग्रामविकास आराखड्यातून येथे बांधण्यात आलेले अभ्यासकेंद्र विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता खुले करून देण्याऐवजी
ठिय्या आंदोलनानंतर कारवाई : युवकांनी घेतला पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड : ग्रामविकास आराखड्यातून येथे बांधण्यात आलेले अभ्यासकेंद्र विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता खुले करून देण्याऐवजी सभा, संमेलन व अन्य कार्यासाठी वापरण्यात येत होते. यामुळे गावातील युवकांनी अभ्यास केंद्र विद्यार्थ्यांना वाचनालयाकरिता खुले करावे, अशी मागणी केली होती. ग्रा.पं. प्रशासन टाळाटाळ करीत होते. परिणामी, संतप्त युवकांनी अभ्यास केंद्रासमोर एक तास ठिय्या आंदोलन केले. अखेर ग्रा.पं. प्रशासनाने अभ्यास केंद्र खुले करून दिले.
ग्रामीण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शासनाच्या विविध योजना असल्या तरी ग्रामस्तरावर त्यांची अंमलबजावणी करण्याबाबत उदासीनता आहे. याचा प्रत्यय येथील ग्रा.पं. प्रशासनाच्या कारभारातून आला. दहा हजार लोकसंख्येच्या गावात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुलभ सुविधा उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने अभ्यास केंद्र उभारण्यात आले; पण ग्रा.पं. ने त्याचा सभा, संमेलने, बैठकांसाठी वापर केला. गावातील काही युवकांनी अभ्यास केंद्र विद्यार्थ्यांना वाचनालय म्हणून खुले करून द्यावे, अशी मागणी केली होती; पण ग्रा.पं. ने कुठलीही उपाययोजना केली नाही. यामुळे युवकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत अभ्यास केंद्र विद्यार्थ्यांना खुले करून देण्यात यावे, अशी मागणी केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावरून संबधित विभागाने ग्रा.पं. प्रशासनासोबत पत्र व्यवहार करीत अभ्यास केंद्र खुले करण्याचे निर्देश दिलेत. या निर्देशांचाही उपयोग झाला नाही. परिणामी, युवकांनी थेट अभ्यास केंद्रासमोर तब्बल एक तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, ग्रा.पं. च्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनासमोर झुकत अभ्यास केंद्र खुले करून दिले. आंदोलनामध्ये शुभम सोरटे, प्रणय खडसे, वैभव कुंभलकर, अजय बावणे, भूपेश गोटे, रितेश मोटघरे, क्षितीज डेकाटे, अतुल डेकाटे, वैभव तुपे, बुध्दघोष थूल, कुणाल सहारे, योगेश मस्कर, शंकर उमाटे आदींनी सहभाग घेतला.