कपाशी पिकावर बुरशीजन्य रोगाचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 11:40 PM2017-10-06T23:40:33+5:302017-10-06T23:40:44+5:30
कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील कपाशी पिकाच्या क्षेत्राची पाहणी करण्यात आली आहे. यात कपाशीवर पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील कपाशी पिकाच्या क्षेत्राची पाहणी करण्यात आली आहे. यात कपाशीवर पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. हा प्रकार पावसाच्या खंडामुळे घडल्याचा संशय कृषी विभागाच्यावतीने व्यक्त केला.
तालुक्यातील वडनेर, फुकटा, टेंभा, तिवसडी, दोंदुडा, बांबर्डा, मानकापूर, परसोडा रिठ, गांगापूर या गावात मोठ्या प्रमाणात तर आर्वी, काचनगाव, पवनी, वेळा, इंझाळा, सिरसगाव, गोपालपूर, नरसिंगपूर, वाघोली, पिपंळगाव, सातेफळ, कडाजना व कवडघाट इत्यादी गावात या आजाराची सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे. या बुरशीजन्य आजारामुळे या भागातील एकूण ५०५.६० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे दिसून आले. या सर्व रोगांमुळे शोधण्याकरिता मौजा वडनेर येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे, तालुका कृषी अधिकारी राष्ट्रपाल मेश्राम, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.आर.टी. गोहोकर वनस्पतीरोग शास्त्रज्ञ यांच्या उपस्थितीत वडनेर शिवारात पंकज मोगलाना नगराळे, महादेव बाळकृष्ण नगराळे, राजेश्वर तानबाजी महाजन यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी करण्यात आली.
कपाशीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. त्यावर नैसर्गिक कारणांचा परिणाम जाणवल्याचे दिसून आले. पावसाचा खंड, हलकी जमीन व खंडानंतर पाऊस हे याचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. बुरशी जमिनीतून मुळाद्वारे कापसाच्या झाडावर मारा करून अन्नद्रव्ये घेणाºया झाडाच्या नलीका क्षतीग्रस्त करतात. यामुळे झाड अचानक वाळल्याचे दिसते.
सदर सर्वेक्षणात वडनेर सरपंच विनोद वानखेडे, उपसरपंच सुमीत सरोदे, यांच्यासह कृषी पर्यवेक्षक ए.व्ही. कोहळे, कृषी सहाय्यक सी.बी. टापरे, कृषी सहायक व्ही.व्ही. बोरकर, कृषी सहायक पी.डब्ल्यु. निखाडे, संदीप हांडे, योगेश डहाके इत्यादींनी सर्वेक्षणाची माहिती सादर केली.