कामगारांना नवीन नियमानुसार बोनस द्या
By admin | Published: October 29, 2015 02:34 AM2015-10-29T02:34:48+5:302015-10-29T02:34:48+5:30
केंद्र सरकारने पारीत केलेल्या विधेयकातील कलम १२ मध्ये कारखाना कामगारांना सात हजार रूपये बोनस देण्यात यावे अशी तरतुद केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना पत्र : हजारो कामगार वंचित
हिंगणघाट : केंद्र सरकारने पारीत केलेल्या विधेयकातील कलम १२ मध्ये कारखाना कामगारांना सात हजार रूपये बोनस देण्यात यावे अशी तरतुद केली आहे. हा निर्णय १ एप्रिल २०१५ पासून लागू करण्यात आला आहे. यात कारखाना कामागारांसाठी बोनसची कमाल मर्यादा सात हजार रूपये करण्यात आली असताना येथील कामगार मात्र या लाभापासून वंचित आहे. याची दखल घेत कामगारांना लाभ मिळवून देण्याची मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका पत्रातून केली आहे.
हिंगणघाट व परिसरात लहान-मोठे स्वरुपातील उद्योग आहे. येथे हजारो कामगार काम करतात. त्यांना १ एप्रिल २०१५ पासून लागू केलेल्या सुधारीत कायद्यानुसार सात हजार रूपये बोनस देण्याची तरतुद करण्यात यावी. येथील कामगारांना लाभ मिळत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. यात आर.एस.आर. स्पिनींग अॅन्ड विव्हींग मिल, हिंगणघाट, गिमाटेक्स इंडस्ट्रिज, हिंगणघाट, गिमाटेक्स इंडस्ट्रिज, वणी, ता. हिंगणघाट, पी.व्ही. टेक्सटाईल्स, जाम, ता. समुद्रपूर, आर.एस.आर. मोहता स्पिनींग अॅन्ड विव्हिंग मिल्स, बुरकोनी, ता. हिंगणघाट यासह हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील असलेल्या सर्व जिनींग व प्रेसींग युनिट, दाल मील व अन्य उद्योगांचा यात समावेश करण्याची मागणी केली. केंद्र सरकारचे विधेयक लागू असताना त्यांना याच लाभ मिळत नाही. दिवाळीमध्ये कामगारांना मिळणारा बोनस केंद्र सरकारच्या विधेयकानुसार असावा, अशी मागणी पत्रातून केली आहे.(तालुका प्रतिनिधी)
केंद्र सरकारच्या विधेयकातील तरतूद
या नियमानुसार ज्या कारखान्यात २० किंवा त्यापेक्षा अधिक कामगार कार्यरत आहे त्या उद्योगासाठी हा नियम केंद्र सरकारने लागू केला आहे. सध्या ही मर्यादा ३ हजार ५०० रूपये आहे. यात सुधारणा करुन १ एप्रिल २०१५ पासून लागू मर्यादा वाढविली आहे.
वेतनानुसार दिल्या जाणाऱ्या पात्र बोनसची मर्यादा ही दरमहा १० हजार रूपयांवरून २१ हजार रूपये करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी करण्याची सूचना येथील उद्योगांना देण्यात यावी. दिवाळीच्या सणात याचालाभ कामगांना मिळावा, याकरिता त्वरीत प्रयत्न करण्याची मागणी पत्रातून केली आहे.