नंदोरी मार्गावरील जड वाहतूक धोक्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 11:52 PM2018-01-05T23:52:43+5:302018-01-05T23:53:05+5:30
शहरातील नंदोरी मार्ग वर्दळीचा असून या मार्गावर सध्या जड वाहतूक वाढत आहे. या जड वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून ही वातूक बंद करण्याची मागणी या भागातील नागरिकांना आ. समीर कुणावार यांच्याकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : शहरातील नंदोरी मार्ग वर्दळीचा असून या मार्गावर सध्या जड वाहतूक वाढत आहे. या जड वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून ही वातूक बंद करण्याची मागणी या भागातील नागरिकांना आ. समीर कुणावार यांच्याकडे केली आहे.
या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी लोकवस्ती आहे. त्याचबरोबर भैय्याजी साळवे विद्यालय, गुरुकुल कॉन्व्हेन्ट, रडर शाळा, बँका आणि इतर कार्यालयेही आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून रहदारीही मोठ्या प्रमाणात असते. गत १-२ वर्षांपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत आहे. यामुळे येथील रहिवास्यांना तसेच ग्रामीण भागातून येणाºया जनतेला मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.
याच काळात या रस्त्यावर अनेक दुर्घटना घडल्या. सावली येथील घटना, एस. टी. बस विहिरीत जाणे अशा अनेक घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी हेटी (सावंगी ) येथील गजानन भोयर यांचा टिप्परच्या धडकेने जागीच मृत्यू झाला. या अपघाताला प्रसाशनच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. हा रस्ता जड वाहतुकीकरिता नसताना यावरून वाहतूक सुरू असून वाहन चालकांवर कुठलीही कार्यवाही होत नाही. काही वाहन चालक टोल वाचवीण्याकरिता या रस्त्याचा वापर करीत आहेत. याला लवकरात लवकर अटकाव बसावा यासाठी आ. समीर कुणावार यांना पर्यावरण संवर्धन संस्था तथा नागरिकांच्यावतीने निवेदन देण्यात आले. कुणावार यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेत त्वरित मुख्य अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळ, चंद्रपूर यांना याबाबतचे पत्र पाठवून अवगत केले.
सदर निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उप विभागीय अधिकारी, हिंगणघाट, आरटीओ आदि विभागाला देण्यात येणार आहे. यावेळी समुद्रपूर भाजपा तालुकाध्यक्ष संजय डेहने, नगर सेवक आशिष पर्बत, राजू कामडी, पर्यावरण संवर्धन संस्थेचे आशिष भोयर, ज्वलंत मून, मनोज वरघणे, गणेश भोयर इत्यादी उपस्थित होते.