वेतनातील अनियमिततेने डाटा आॅपरेटर त्रस्त
By admin | Published: October 11, 2014 11:11 PM2014-10-11T23:11:46+5:302014-10-11T23:11:46+5:30
महाआॅनलाईन अंतर्गत कार्यरत डाटा एन्ट्री आॅपरेटर वेतनातील अनियमिततेने त्रस्त आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार आॅपरेटरला वेतन दिले जात नाही. परिपत्रकात नमूद आणि प्रत्यक्षात दिले
वर्धा : महाआॅनलाईन अंतर्गत कार्यरत डाटा एन्ट्री आॅपरेटर वेतनातील अनियमिततेने त्रस्त आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार आॅपरेटरला वेतन दिले जात नाही. परिपत्रकात नमूद आणि प्रत्यक्षात दिले जाणारे वेतन यात तफावत असून प्रत्येक महिन्याला वेतन अनियमित होत असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. काही सक्तीचे नियम बनविल्याने ते जाचक ठरत आहेत. वर्धा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत आॅपरेटर यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा प्रशासनाला निवेदनातून दिला आहे.
महिन्याकाठी मिळणारे वेतन आणि परिपत्रकात नमूद वेतन राशी यातील तफावत दूर न केल्यास ‘काम बंद’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. डाटा एन्ट्री आॅपरेटर युनियनच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. या निवेदनाची प्रत जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी, पोलीस अधीक्षक यांना देण्यात आली आहे.
या निवेदनानुसार, शासनाने जाहीर केलेल्या परिपत्रकात जि.प.स्तरावर एक संगणक प्रोग्रामर, चार संगणक आॅपरेटर तसेच पं.स. स्तरावर एक संगणक प्रोग्रामर आणि दोन आॅपरेटर अशी पदे आहेत. एक हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायत येथे एक डाटा एन्ट्री आॅपरेटरची नेमणूक करण्याचे निर्देश दिले आहे. या सर्व पदांना मानधन निश्चित केले आहे. परंतु ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असणाऱ्या डाटा एन्ट्री आॅपरेटरला निर्धारित आठ हजार रुपये मानधन दिले जात माही. शिवाय अन्यत्र कार्यरत आॅपरेटरला कमी वेतन दिले जाते. यातही अनियमितता असल्याने आॅपरेटर त्रस्त झाले आहे.
शासनाने कोणतेही नवीन परिपत्रक काढले नसताना आॅपरेटरवर जाचक नियम लादण्यात आले आहे. महिन्याला ठरावीक डाटा एन्ट्री न केल्यास वेतन दिले जाणार नाही, अशी जाचक अट आहे. तालुका व जिल्हा समन्वयक यांच्याकडून आॅपरेटरवर सक्ती केली आहे. यामुळे आॅपरेटरला यापुढे वेतन मिळणार का, अशी धास्ती वाटते.
डाटा एन्ट्री आॅपरेटकडून दोन-दोन महिने मानधन न देता कामे करुन घेतली जातात. नव्याने नियुक्त डाटा एन्ट्री आॅपरेटर यांचे मानधन गत पाच दिलेले नाही. हजेरी नियमित असताना वेतनात अनियमितता बाळगली जाते. मात्र अदा केल्या जात नाही. शासनाने सर्वांना मानधन ठरवून दिले असताना अशी तफावत का केली जाते, आदी प्रश्न निवेदनातून उपस्थित केला. वेतनातील तफावत, अनियमितता यावरुन हिंगणघाट येथील आॅपरेटरने शुक्रवारपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन देताना या मागण्यांवर तोडगा न काढण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. शिष्टमंडळात विवेक दुधकोहळे, तुषार राऊत, निलेश वैरागडे, बिट्टू रावेकर, निखिल कहाथे, विपुल शिंदे, संजय काळे, मिथुन धमाने यासह आदींची उपस्थिती होती.(स्थानिक प्रतिनिधी)