एक प्रकल्प, दोन तलाव कोरडे

By admin | Published: April 20, 2017 12:46 AM2017-04-20T00:46:05+5:302017-04-20T00:46:05+5:30

गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील जलाशयांनी बऱ्यापैकी पातळी गाठली होती;

One project, two lakes dry | एक प्रकल्प, दोन तलाव कोरडे

एक प्रकल्प, दोन तलाव कोरडे

Next

तीन प्रकल्पांनी गाठला तळ : जलाशयांत सरासरी १९.९१ टक्के जलसाठा
वर्धा : गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील जलाशयांनी बऱ्यापैकी पातळी गाठली होती; पण आता तापमानाने एप्रिल महिन्यातच कमाल मर्यादा गाठल्याने जलसाठ्यांमध्येही झपाट्याने घट होत असल्याचे पाहावयास मिळते. एप्रिल महिन्याच्या मध्यातच दोन तलाव व एक प्रकल्प कोरडा पडला असून तीन प्रकल्पांनी तळ गाठला आहे. शिवाय तलावांतील जलसाठ्यात कमालीची घट झाल्याने तीव्र पाणीटंचाईचे संकेत मिळू लागले आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा, उद्योगांना तसेच पिण्याचे पाणी पुरविण्याकरिता मोठे व मध्यम अशी १४ प्रकल्प असून २० तलाव आहेत. यातील वर्धा नदीवर असलेल्या अप्पर व निम्न वर्धा, धाम नदीवरील महाकाळी, बोर नदीवरील बोरधरण व वर्धा कार नदी प्रकल्प यावर पाणी पुरवठा योजना आहेत. शिवाय यातील पाणी सिंचन व उद्योगांकरिताही आरक्षित करण्यात आलेले आहे. सध्या या मोठ्या व मध्यम प्रकल्पांमध्ये जलसाठा असला तरी उन्हाळाभर पाणी पुरवठा होऊ शकेल, एवढा साठा नाही. यामुळे पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सेलू तालुक्यातील मदन उन्नई प्रकल्प कोरडा पडला आहे. या प्रकल्पाची २७१.३० दलघमी साठवण क्षमता आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात पोथरा व पंचधारा हे दोन प्रकल्प कोरडे पडले होते; पण पावसाचे अत्यल्प प्रमाण त्यास कारणीभूत होते. पातळी न गाठल्यानेही झपाट्याने पाणी घटले होते; पण यंदा पातळी गाठूनही एक प्रकल्प कोरडा पडला असून पोथरा, पंचधारा, डोंगरगाव या प्रकल्पांनी तळ गाठला आहे. या जलाशयांत अनुक्रमे १.७१, १.६८ व ०.९८ दलघमी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील १४ जलाशयांमध्ये सरासरी १९.९१ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिलेला आहे. आता या जलसाठ्यावर जिल्ह्यातील सिंचन, उद्योग आणि पाणी पुरवठा योजना किती काळ टिकतील, हा प्रश्नच आहे.
सिंचन आणि पाणी पुरवठ्यामध्ये हातभार लावणाऱ्या जिल्ह्यातील २० पैकी परसोडी व बोरखेडी हे दोन तलाव कोरडे पडले आहेत. शिवाय उर्वरित १८ तलाव मिळूनही केवळ ५.४८ दलघमी जलसाठा शिल्लक राहिलेला आहे. यातील पारगोठाण, कवाडी व मलकापूर तलावांनी तळ गाठला असून उर्वरित तलावांतही अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. पाणी पुरवठा नसला तरी अनेक तलावांवर शेतकऱ्यांचे सिंचन अवलंबून आहे. हे तलाव एकामागून एक कोरडे पडत असल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर होईल, असे चित्र आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

उपाययोजनांना गती गरजेची
जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने ४३३ उपाययोजना आखल्या आहेत. यात एप्रिल ते जून या दुसऱ्या टप्प्यात ३०५ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यावर ५ कोटी ५४ लाख ३४ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. या आराखड्यात ५० सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, ११२ नळ पाणी पुरवठा विहिरींची विशेष दुरुस्ती, ७ गावांत तात्पुरती पूरक योजना आणि १४८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्याचा मध्यावधी सुरू असताना या उपाययोजनांना वेग आल्याचे दिसत नाही. यामुळे या उपाययोजनांना गती देणे गरजेचे झाले आहे.

तापमानाच्या उच्चांकामुळे जलसाठ्यात वेगाने घट
जिल्ह्यात साधारण मे महिन्यात उन्हाचा पारा ४५-४७ अंशांवर पोहोचतो; पण यंदा एप्रिल महिन्याच्या मध्यावधीतच पाऱ्याने ४५ अंश सेल्सिअस पार केले आहे. या परिणाम जिल्ह्यातील जलाशयांवर होऊ लागला आहे. पाण्याचे बाष्पीभवनही झपाट्याने होत असल्याने जलसाठ्यात दिवसागणिक घट होत असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

 

Web Title: One project, two lakes dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.