खांब उभे झाले; पण वीजपुरवठा ठप्प

By admin | Published: July 8, 2015 02:15 AM2015-07-08T02:15:54+5:302015-07-08T02:15:54+5:30

वितरण कंपनी व कंत्राटदार यांच्या राजकारणात देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Pillars stood; But power supply jam | खांब उभे झाले; पण वीजपुरवठा ठप्प

खांब उभे झाले; पण वीजपुरवठा ठप्प

Next

शेतकऱ्यांचे ओलित ठप्प : पाऊस नाही आणि सिंचनही नसल्याने पिकांना धोका
वर्धा : वितरण कंपनी व कंत्राटदार यांच्या राजकारणात देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अवघ्या तीनच महिन्यात जमिनीवर झोपलेले विद्युत खांब उभे करण्यात आले; पण अद्याप वीज पुरवठा सुरू केला नाही. यामुळे शेतकऱ्यांना ओलित करणे कठीण झाले आहे. पावसाने दडी मारली आणि ओलिताची सोय असताना वीज पुरवठा नसल्याने अंकूर करपत असल्याचे दिसून येत आहे.
देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे शासनाच्या जलपुर्ती व महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत नवीन दहा सिंचन विहिरी देण्यात आल्या होत्या. या दहाही विहिरीवर विद्युत जोडणी देण्यात आली; पण खांब गाडताना निकृष्ट काम करण्यात आले. यामुळे अवघ्या तीन महिन्यांत पहिल्याच पावसात सर्व विद्युत खांब जमिनीवर पालथे झाले. याबाबत शेतकऱ्यांनी महावितरणकडे तक्रार केल्यावर वीज पुरवठा बंद केला; पण खांब उभे करण्यासाठी कंत्राटदाराशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. निसर्गाच्या प्रकोपामुळे आधीच मेटाकुटीस अलेल्या शेतकऱ्याला वीज वितरण कंपनीकडून त्रास दिला जात असल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे.
याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर वीज वितरण कंपनी व संबंधित कंत्राटदाराला जाग आली. वृत्ताची दखल घेत लगेच सर्व खांब उभे करून तारही जोडण्यात आले. आता चार ते पाच दिवसांचा कालावधी लोटला असताना वीज पुरवठा मात्र सुरू करण्यात आला नाही. परिणामी, पिकांचे मोठे नुकसान होत आहे. प्रारंभी शेतात विद्युत खांब पडून राहिल्याने आठ ते दहा दिवस शेतातील मशागतीची कामे खोळंबली होती. यामुळे पेरणी लांबली आणि आता खांब उभे केले; पण वीज पुरवठा सुरू केला नसल्याने ओलित करणे अशक्य झाले आहे. परिणामी, विद्युत वितरण कंपनी व कंत्राटदार यांच्या वादात पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत वीज पुरवठा सुरू करावा, अशी मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
योजना निरूपयोगीच
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, शेतकरी संपन्न व्हावा या उद्देशानेच शेतकऱ्यांना सिंचन विहिरी देण्यात आल्या; पण या विहिरीच्या भानगडी सुरू असल्याने त्याचा शेतकऱ्यांना लाभ घेता येत नाही. प्रारंभी विद्युत जोडणीला विलंब झाला. कृषी पंपांना वीज जोडणी मिळाली तर पहिल्याच पावसात सर्व विद्युत खांब जमीनदोस्त झाले. यामुळे पेरणी व मशागतीच्या कामांत अडचणी आल्या. आता खांब उभे केले तर वीज पुरवठा नाही. पावसाने दडी मारल्यावर या विहिरीवरून ओलित करून पिके जगवता आली असती; पण महावितरणच्या प्रतापाने तेही शक्य नसल्याने पिके करपत आहे. यामुळे या योजनेचा नेमका फायदा तरी काय, असा प्रश्न संतप्त शेतकरी उपस्थित करीत आहेत.
अहवाल अप्राप्त
विद्युत खांब पडल्यावर ते पुन्हा उभे करून तार जोडणीचे काम करण्यात आले. याबाबतचा सर्व अहवाल कंत्राटदाराकडून प्राप्त झाल्यावरच वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. सदर प्रक्रिया सुरूच आहे, असे मत देवळीचे उपकार्यकारी अभियंता ठाकरे यांनी व्यक्त केले.
अहवाल पाठविला आहे
सोनेगाव (बाई) येथील शेतातील खांब उभे करून तार जोडणी करून अहवाल महावितरणकडे पाठविला आहे. सर्व काम झाले असून वीज पुरवठा सुरू करण्याची जबाबदारी महावितरणची असल्याचे रूद्राणी कंपनीचे संचालक तथा कंत्राटदार दिलीप शिवगन यांनी सांगितले.

Web Title: Pillars stood; But power supply jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.