राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:39 PM2017-09-18T23:39:58+5:302017-09-18T23:40:16+5:30
महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा २०१६-२०१७ चा ‘राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार’ कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर यांना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा २०१६-२०१७ चा ‘राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार’ कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर यांना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख उपस्थितीत होते. सोमवारी सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात एका शासकीय कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र शासनातर्फे विविध क्षेत्रातील १०७ शिक्षकांना प्रत्येकी प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह व १ लाख १० हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. यात नागपूर विभागातून एकूण १८ शिक्षकांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक विभागातून आर्वी तालुक्यातील शिरपूर येथील मारोती गणपत विरुरकर तर माध्यमिक व उच्च माध्य. विभागातून देवळीच्या एसएसएने महाविद्यालयातील कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने कॅप्टन गुजरकर यांनी होमगार्डसचे जिल्हा समादेशक म्हणून यशस्वीपणे कार्यभार सांभाळला आहे. त्यांना जिल्हा प्रशासनातर्फे चार वेळा ‘शौर्य पुरस्काराने’ गौरविण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना स्काऊट क्षेत्राकरिता ‘उपराष्ट्रपती पुरस्कार’ व लक्ष्मी मुजूमदार राष्ट्रीय पुरस्कार तथा राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे ‘बेस्ट एनसीसी अधिकारी’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.