शिवाजी महाराजांची जन्मतारीख चुकीची? सीबीएसईच्या पाठ्यपुस्तकात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:12 PM2019-05-27T12:12:35+5:302019-05-27T12:13:18+5:30

सीबीएसई अभ्यासक्रमाच्या पुस्तकात चक्क हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीखच चुकीची दिली आहे.

Shivaji Maharaj's birth date is wrong? In the CBSE textbook, | शिवाजी महाराजांची जन्मतारीख चुकीची? सीबीएसईच्या पाठ्यपुस्तकात घोळ

शिवाजी महाराजांची जन्मतारीख चुकीची? सीबीएसईच्या पाठ्यपुस्तकात घोळ

googlenewsNext
ठळक मुद्देपालकांच्या लक्षात आली चूक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पाठ्यपुस्तकाच्या आधारेच विद्यार्थी जगाच्या आणि देशाचा इतिहास अभ्यासतात. विद्यार्थ्यांना गुणवत्ता आणि बुद्धिमत्तेकरिता पुस्तकेच मैलाचा दगड ठरतात. परंतु, आता पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून चुकीचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकविला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सीबीएसई अभ्यासक्र माच्या पुस्तकात चक्क हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीखच चुकीची दिली आहे. त्यामुळे अशा पाठ्यपुस्तकाच्या आधारे विद्यार्थी कसे घडणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
न्यू सरस्वती हाऊस (इंडिया) प्रा.लि. नवी दिल्लीच्यावतीने सीबीएसईच्या अभ्यासक्रमातील वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. मंजूषा संजय स्वामी लिखित ‘सप्तरंग मराठी पाठ्यपुस्तक-५’ या नावाने पुस्तकाचे प्रकाशन केले. हे पुस्तक हिंगणघाट येथील एका मोठ्या खासगी विनाअनुदानित सीबीएसई अभ्यासक्रमाच्या वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक सत्र २०१९-२० करिता उपयोगात येणार आहे. या शाळेतून पालकांनी या पुस्तकांची खरेदीही केली असून एका सुज्ञ पालकाने या पुस्तकाचे अवलोकन केल्यानंतर ही गंभीर चूक त्यांच्या लक्षात आली. या पुस्तकातील अकरा क्रमांकाचा पाठ छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित आहे. या पाठाचे वाचन केल्यानंतर या पाठात शिवरायांची जन्मतारीख १९ फेबु्रवारी १६२७ असल्याचे नमूद केले आहे. वास्तविक शिवरायांची जन्मतारीख १९ फेब्रुवारी १६३० आहे. त्यामुळे या पाठ्यपुस्तकाच्या आधारे येत्या शैक्षणिक सत्रात शिवरायांचा चुकीचा इतिहास शिकविण्याची दाट शक्यता असल्याने, यात बदल करण्याची गरज व्यक्त होत आहे.

जन्मतारखेबाबतचा हा पुरावा
महाराष्ट्र शासनाच्यावतीने नेमलेल्या अभ्यास समितीद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख १९ फेब्रुवारी १६३० ही जाहीर करण्यात आलेली आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणेद्वारा प्रकाशित वर्ग चौथीच्या पाठ्यपुस्तकातील चौथ्या पाठातील पान क्रमांक १३ वर आणि वर्ग ७ वीच्या पाठ्यपुस्तकात पाचव्या पाठातील पान क्रमांक १९ वर छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख १९ फेबु्रवारी १६३० अशीच नमूद आहे.

पुस्तक चाळल्यानंतर पुस्तकातील ही गंभीर चूक लक्षात आली. येत्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना चुकीचे ज्ञान मिळण्याची शक्यता असल्यामुळे मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले. सोबतच स्वत: संबंधित प्रकाशनाला आणि सीबीएसई मंडळाच्या अध्यक्षांकडे पोस्ट आणि ईमेलद्वारे माहिती देऊन ही चूक दुरुस्त करण्याची विनंती केली आहे. ही चूक दुरुस्त झाली नाही तर शासनाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली जाईल. -नीलेश गुल्हाने, सामाजिक कार्यकर्ता.

Web Title: Shivaji Maharaj's birth date is wrong? In the CBSE textbook,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.