सहा वर्षांत २४३ नेत्रदात्यांमुळे ११३ अंधांना दृष्टी
By admin | Published: June 13, 2017 01:05 AM2017-06-13T01:05:28+5:302017-06-13T01:05:28+5:30
मृत्यूनंतर दान केलेल्या मृतकांच्या डोळ्याने एखादा नेत्रहिन हे सुंदर जग बघू शकतो. त्यामुळे नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे समाजातील प्रत्येक स्तरातून सांगितले जाते.
दृष्टीदान सप्ताह; जिल्ह्यात नेत्रपेढीची मागणी : २३३ नेत्र पाठविले संशोेधनासाठी
महेश सायखेडे । लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मृत्यूनंतर दान केलेल्या मृतकांच्या डोळ्याने एखादा नेत्रहिन हे सुंदर जग बघू शकतो. त्यामुळे नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे समाजातील प्रत्येक स्तरातून सांगितले जाते. गत सहा वर्षात २४३ नेत्रदात्यांमुळे ११३ नेत्रहीनांना दृष्टी मिळाली असून दान केलेल्या ४८६ नेत्रांपैकी १७७ नेत्र निरुपयोगी ठरले आहे. तर २३३ नेत्र संशोधनासाठी वापरण्यात आल्याचे सांगण्यात आले.
जास्तीतजास्त नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प सोडावा यासाठी शासकीय यंत्रणेसह विविध सामाजिक संघटना नेत्रदानाचे महत्त्व पटवून देतात. जिल्ह्यात नेत्रदानाच्या कामासाठी विविध सामाजिक संघटनाही कार्य करीत आहेत. जगातील एकूण नेत्रहीन व्यक्तींपैकी २० टक्के म्हणजे नेत्रहीन भारतात आहेत. सगळ्याच नेत्रहिनांना दृष्टी मिळू शकत नाही. ज्यांची नेत्रबुबुळे निकामी झाली आहेत; पण बाकीचा डोळा चांगल्या स्थितीत आहे अशांनाच दृष्टी प्राप्त होऊ शकते.
सन २०११-१२ मध्ये ४९ नेत्रदात्यांनी दान केलेल्या ९८ डोळ्यांपैकी २० नेत्र बुबुळांचे यशस्वी रोपण केले. २९ नेत्र बुबुळे निरुपयोगी ठरले आणि ४९ नेत्र बुबुळे संशोधनासाठी पाठविण्यात आली आहेत. सन २०१२-१३ मध्ये ३३ नेत्रदात्यांनी दान केलेल्या ६६ डोळ्यांपैकी १७ नेत्र बुबुळांचे यशस्वी रोपण करण्यात आले. तर ३० नेत्र बुबुळे निरुपयोगी ठरले आणि १९ नेत्र बुबुळे संशोधनासाठी पाठविण्यात आली. सन २०१३-१४ मध्ये २० नेत्रदात्यांनी दान केलेल्या ४० डोळ्यांपैकी १८ नेत्र बुबुळांचे यशस्वी रोपण करण्यात आले. ११ नेत्र बुबुळे निरुपयोगी ठरले आणि १५ नेत्र बुबुळे संशोधनासाठी पाठविण्यात आली. सन २०१४-१५ मध्ये ३९ नेत्रदात्यांनी दान केलेल्या ७८ डोळ्यांपैकी १९ नेत्र बुबुळांचे यशस्वी रोपण झाले. तर १५ नेत्र बुबुळे निरुपयोगी ठरले आणि १४ नेत्र बुबुळे संशोधनासाठी पाठविण्यात आली. सन २०१५-१६ मध्ये ३९ नेत्रदात्यांनी दान केलेल्या ७८ डोळ्यांपैकी १६ नेत्र बुबुळांचे यशस्वी रोपण झाले. तर २० नेत्र बुबुळे निरुपयोगी ठरले आणि ४३ नेत्र बुबुळे संशोधनासाठी पाठविण्यात आली. सन २०१६-१७ मध्ये ६३ नेत्रदात्यांनी दान केलेल्या १२६ डोळ्यांपैकी २३ नेत्र बुबुळांचे यशस्वी रोपण करण्यात आले. तर १२ नेत्र बुबुळे निरुपयोगी ठरले आणि ९३ नेत्र बुबुळे संशोधनासाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
उपराजधानी वगळता एकाही ठिकाणी शासकीय नेत्रपेढी नाही
वर्धा जिल्ह्यात नेत्रदानासाठी प्रभावी कार्य होत असले तरी संपूर्ण विदर्भात उपराजधानी नागपूर वगळता कुठेही शासकीय नेत्रपेढी नसल्याचे सांगण्यात येते. शासकीय नेत्रपेढी नसल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला खासगी नेत्रपेढीचे वेळोवेळी सहकार्य घ्यावे लागते. महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभुमी असलेल्या जिल्ह्यात कामाचा व्याप लक्षात घेता शासकीय नेत्रपेढी तयार करण्याची मागणी आहे.
तात्काळ भरून द्यावे लागते प्रतिज्ञापत्र
ज्यांचे नेत्रबुबुळ चांगले आहे. परंतु, इतर काही दोषांमुळे अंधत्त्व आले अशा अंधाचेही नेत्रदान होऊ शकते. मृत्यूनंतर तात्काळ म्हणजे ३ ते ४ तासांपर्यंत नेत्रदान होणे आवश्यक आहे. नेत्रदानाकरिता नेत्रसंकलन केंद्र किंवा नेत्रपेढीचे प्रतिज्ञापत्र भरून घ्यावे. मरणोत्तर नेत्रदान केले तर एखाद्या दृष्टिहिनाचे जीवन प्रकाशमय होऊ शकते.
कुठल्याही प्रकारचा चष्मा लावणारे, मोतीबिंदू शस्त्रक्रीया झालेले, मधुमेही व रक्तदान पीडितही नेत्रदान करू शकतात.
मृत व्यक्तीला एड्स, अलार्क (रेबीज), कावीळ, कर्करोग, सिफिलिस, धनुर्वात किंवा विषाणूंपासून होणारे रोग तसेच नेत्रबुबुळाच्या रोग्याचे नेत्र रोपणासाठी निरुपयोगी ठरतात.
पोलिसांच्या परवानगीने अपघाती मृतकाचे होते नेत्रदान
नेत्रदानास धार्मिक बंधन नाही. कुठलाही धर्म अशा महान कार्याला विरोध करीत नाही. जन्मजात बालकापासून तर अगदी १०० वर्षांच्या स्त्री-पुरूषांपर्यंत कुणीही नेत्रदान करू शकतो. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नेत्रबुबुळ चांगल्या स्थितीत असल्यास पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने नेत्रदान होऊ शकते.