जलसंधारण अभियानाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 11:57 PM2018-01-08T23:57:32+5:302018-01-08T23:59:35+5:30
अनेक विद्वानांनी तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, असे भाकीत केले आहे. आज संपूर्ण विश्वातच पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे.
आॅनलाईन लोकमत
सेलू : अनेक विद्वानांनी तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, असे भाकीत केले आहे. आज संपूर्ण विश्वातच पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. पावसाचे प्रमाणही देशात व राज्यात कमी होत आहे. अशा परिस्थितीत नियोजन होणे आवश्यक आहे. याच हेतुने सेलू येथे विद्याभारती महाविद्यालयाच्यावतीने जलसंधारण चळवळ उभी करण्यात आली आहे. सोमवारी सिनेतारका सोनाली कुळकर्णी यांच्या उपस्थितीत येथील विद्याभारती महाविद्यालयातून जलसंधारण अभियानास प्रारंभ करण्यात आला.
जलसंधारण अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला माजी खासदार दत्ता मेघे, विद्याभारती संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.जी. भोयर, आ.डॉ. पंकज भोयर, वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ.सचिन पावडे, प्राचार्य डॉ. संजय कानोडे, अॅड. शितल भोयर, डॉ. पावडे उपस्थित यांची उपस्थिती होती.
आ.डॉ. भोयर म्हणाले की, या अभियानासाठी सेलू तालुक्याची निवड झाली ही भुषणावह बाब आहे. सेलू तालुक्यात अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खाली गेली आहे. भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे. परंतु त्या तुलनेत पाणी जमिनीत जिरविण्यासंदर्भात कोणतेच कार्य आजपर्यंत झाले नाही. त्याचा परिणाम आज शेतकऱ्यांपासून तर सर्वसामान्य नागरिकही भोगत आहे. जलसंवर्धनाच्या माध्यमातून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढणार आहे. या लोकाभिमुख चळवळीत युवक युवतींनी सहभाग घ्यावा व ही चळवळ यशस्वी करावी असे आवाहनही त्यांनी केले.
माजी खासदार दत्ता मेघे यांनी अभियान यशस्वी करावे असे आवाहन केले. डॉ.सचिन पावडे यांनी वैद्यकीय जनजागृती मंचाने केलेल्या जलसंधारण कार्याची माहिती दिली. प्रास्ताविकातून पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक अशोक बगाडे यांनी फाउंडेशनच्या उपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमाला फाउंडेशनचे अशोक सूर्यवंशी, दळवी, पं.स.चे विस्तार अधिकारी संजय वानखेडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अभिजीत पाटील यांनी केले तर आभार भाष्कर घैसास यांनी मानले.
युवकांच्या शक्तीतुनच पाण्याची क्रांती शक्य -सोनाली कुळकर्णी
राज्यात गत काही वर्षात दुष्काळ पडत आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम राज्यात सुरू आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा हा संदेश घरोघरी पोहोचविणे गरजेचे आहे. आजच्या कार्यक्रमाला युवक व युवतींची उपस्थिती लक्षणीय आहे. युवकांच्या शक्तीतुनच नवीन पाण्याची क्रांती होऊ शकते, असे विचार सिनेतारका सोनाली कुळकर्णी यांनी केले.
युवक युवतींनी पाण्याच्या संवर्धनासाठी पुढे यावे. त्यांनी आपली संपूर्ण उर्जा याकामी लावावी. यातून हा परिसर सुजलाम झाल्याशिवाय राहणार नाही. पाण्याचा जमिनीतील स्तर वाढविणे आवश्यक आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याचा स्तर वाढविण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात उद्बोधन करण्याकरिता युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.