अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला १० वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 11:50 PM2018-02-05T23:50:55+5:302018-02-05T23:51:16+5:30
घरी असलेल्या पाहुणीवर अत्याचार करणाऱ्या रोशन ईरपाचे रा. महाकाळ याला बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : घरी असलेल्या पाहुणीवर अत्याचार करणाऱ्या रोशन ईरपाचे रा. महाकाळ याला बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल येथील येथील न्यायाधीश अंजु शेंडे यांनी सोमवारी दिला.
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, महाकाळ येथील रहिवासी आरोपी रोशन ईरपाचे याने घरी दारू पिवून येत त्याच्या आईला ५०० रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्याने त्याने भांडण करून आई व वडीलांना घराच्या बाहेर हाकलून दिले. त्यावेळी घरात पीडिता व तिची बहीण एकटीच घरी होती. आरोपीने पिडीतेला चुना आणण्यास बाजूच्या घरी पाठविले. ती घरी परत आल्यानंतर पीडिताची लहान बहीन झोपली असता त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडिताला नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरात घेवून गेला. तेथे सुध्दा तिच्यावर अत्याचार केला. सदर प्रकरणात कैलास ईरपाचे याने तक्रार दाखल केल्याने सदर गुन्हा समोर आला.
हे प्रकरण साक्षपुराव्यावर आले असता सहायक सरकारी अभियोक्ता विनय घुडे यांनी एकूण ११ साक्षीदार तपासले व युक्तीवाद केला. साक्षीदाराचे पुरावे व वैद्यकीय अहवाल ग्राह्य धरण्यात आले. साक्षपुरावे व युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश अंजू शेंडे यांनी आरोपीला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ब्रिजपाल ठाकूर यांनी केला.