सोशालिस्ट चौकात सामाजिक संघटनांनी अर्पण केली श्रद्धांजली, शहीद जवान अमर रहे...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 04:55 PM2019-02-15T16:55:01+5:302019-02-15T16:56:42+5:30
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 38 जवान शहीद झाले.
वर्धा : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 38 जवान शहीद झाले. दहशतवाद्यांकडून झालेला हा प्रकार निंदनीय असून, त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी वर्धेतील विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी स्थानिक सोशालिस्ट चौकात दुपारी एकत्र येत ‘शहीद जवान अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. यावेळी उपस्थितांनी मौन पाळून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
जम्मू-कश्मीर येथील पुलवामा येथे जम्मूवरून श्रीनगरच्या दिशेने जाणा-या जवानांना टार्गेट करून हा हल्ला करण्यात आला. यात 38 जवान शहीद झाले असून देशात सुरक्षा जवानांवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. या घटनेमुळे देशात सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात असून, या भ्याड हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असून दहशतवाद्यांना मदत करणा-या पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारत सरकारने तातडीने पाऊल उचलावीत, अशी मागणी यावेळी विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिका-यांनी केली. याप्रसंगी विविध संघटनेच्या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी दोन मिनिट मौन पाळून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
या उपक्रमात प्रहारचे शहर प्रमुख विकास दांडगे, वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, माजी सैनिक संघटनेचे श्याम परसोडकर, बजरंग दलचे अमित ठाकूर, घनश्याम अहेरी, पतंजली महिला संघटना, जय हिंद फाऊंडेशन, नॅशनल युथ युनियनसह आदी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. घोषणाबाजी केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी सोशालिस्ट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी दुचाकी रॅली काढून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना सादर केले.
पाकिस्तानच्या प्रतीकात्मक राष्ट्रध्वजाची होळी
जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक सोशालिस्ट चौकात विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी एकत्र येत दहशतवाद्यांना मदत करणा-या पाकिस्तानच्या प्रतीकात्मक राष्ट्रध्वजाची होळी केली. शिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे छायाचित्र जाळून आपला रोष व्यक्त केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादचे नारे लावत शहीद जवान अमर रहे अशाही घोषणा दिल्या. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आंदोलनस्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.