वर्धा स्फोटातील कंत्राटदार चांडकचा भ्रमणध्वनी स्विच आॅफ आणि घर कुलूपबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 03:52 PM2018-11-27T15:52:22+5:302018-11-27T15:54:25+5:30
पुलगावच्या केंद्रीय दारूगोळा भांडारात झालेल्या स्फोट प्रकरणी चौकशीअंती कंत्राटदार शंकर चांडक याच्याविरुद्ध देवळी पोलीस ठाण्यात घटनेच्या पाच दिवसानंतर भादंविच्या कलम ३०४, ३०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: पुलगावच्या केंद्रीय दारूगोळा भांडारात झालेल्या स्फोट प्रकरणी चौकशीअंती कंत्राटदार शंकर चांडक याच्याविरुद्ध देवळी पोलीस ठाण्यात घटनेच्या पाच दिवसानंतर भादंविच्या कलम ३०४, ३०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या दिवशीपासून कंत्राटदार चांडक याचा भ्रमणध्वनी बंद येत असून घरही कुलूप बंद आहे. या प्रकरणातील आरोपी चांडकच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन तर देवळी पोलिसांची एक चमू अलर्ट करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल होऊन २४ तास लोटूनही आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. सध्या पोलीस अधिकारी व कर्मचारी आपल्या खबऱ्यांकडून माहिती गोळा करीत आहेत. पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या स्फोटक विनाशक स्थळी कालबाह्य झालेले विमानभेदी गोळे निकामी करताना मजूराच्या डोक्यावरून स्फोटक भरलेली एक पेटी जमिनीवर पडली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न होता भीषण स्फोट झाला. यात एका सैनिकासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला तर १७ जण जखमी झाल्याने सुरूवातीला देवळी पोलिसांनी या प्रकरणी कलम १७४ जाफो अंतर्गत नोंद घेतली. त्यानंतर चौकशीअंती कंत्राटदाराकडून स्फोटक पदार्थ कायद्याचे उल्लंघन केल्याचे पुढे येताच वरिष्ठ अधिकाºयांच्या मार्गदर्शनात रविवारी रात्री कंत्राटदार शंकर चांडक याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०४, ३०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळी पोलिसांच्या चमूने पुलगाव येथे आरोपीचा शोध घेतला; पण त्यांना यश आले नाही. तर स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पोलिसी चमूने नागपुरात आरोपीचा शोध घेतल्याचे बोलले जात आहे. आरोपी चांडक हा पुलगाव येथील रहिवासी असून तो आपल्या कुटुंबियांसह घटनेनंतर पसार झाला. सध्या त्याच्या घराला कुलूप असून त्याचा मोबाईलही स्विच आॅफ येत असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय चमूने केलेल्या दोन शवविच्छेदनांचा अहवाल देवळी पोलिसांना मंगळवारी दुपारी प्राप्त झाला. तर उर्वरित चार मृतकांच्या शवविच्छेदनाचा अहवाल सायंकाळी उशीरापर्यंत देवळी पोलिसांना मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सुरक्षेची साहित्य न पुरविता करून घेतली जात होती जोखमीची कामे
कंत्राटदार शंकर माणिकलाल चांडक हा त्यांच्याकडे कामावर असलेल्या मजुरांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधनांची साहित्य न पुरविता जोखमीची कामे करून घेत होता, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे.
स्फोटक पदार्थ कायद्याचे उल्लंघन
साधे बॉम्ब सदृष्य साहित्य आढळल्यास सदर साहित्य हाताळाचा प्रयत्न करताना सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना केल्या जातात. परंतु, आपण हाताळत असलेले साहित्य स्फोटक आणि कालबाह्य असलेल्या विमानभेदी गोळ्या असल्याचे माहीत असताना कंत्राटदाराच्यावतीने सुरक्षेच्या दृष्टीने पाहिजे तशी दक्षता घेण्यात आली नाही. स्फोटक पदार्थ कायद्याचे चक्क उल्लंघनच करण्यात आल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.
सैनिकी प्रशासनाकडून पोलिसांना सहकार्याची अपेक्षा
सदर प्रकरणी वरिष्ठांच्या सूचना प्राप्त होतच पोलीस प्रशासनाच्यावतीने आरोपींविरुद्ध देवळी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पुलगावचे केंद्रीय दारूगोळा भांडार प्रशासन देवळी पोलिसांना खरच पाहिजे तसे सहकार्य करेल काय, अशी चर्चा होत असली तरी देवळी पोलिसांना सैनिकी प्रशासनाकडून तपासात सहकार्याची अपेक्षा आहे.
रोबोटचा वापर ठरला असता फायद्याचा
कालबाह्य झालेले बॉम्ब तसेच स्फोटक निकामी करताना टेक्नीशीयनच्या उपस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने सेफ्टी जॅकेट, सुरक्षीत ट्रॉली आदींचा वापर होणे क्रमप्राप्त आहे. शिवाय सदर प्रक्रिया पूर्ण करताना रिमोटींग पद्धतीचाही अवलंब करता येतो. इतकेच नव्हे तर सध्याच्या विज्ञान युगात कालबाह्य स्फोटक निकामी करण्यासाठी रोबोटचाही वापर करता येत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. कदाचीत रोबोटचा वापर केल्या गेला असता तर जीवितहानी टाळता आली असती असे बोलल्या जात आहे.