सधन कुटुंबेही रोहयो यादीत?
By admin | Published: November 27, 2015 01:52 AM2015-11-27T01:52:49+5:302015-11-27T01:52:49+5:30
विक्रमगड तालुक्यात रोजगार हमीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे श्रमजीवी संघटनेने उघडकीस आणले असून अशा बोगस कामांची चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई व्हावी
विक्रमगड : विक्रमगड तालुक्यात रोजगार हमीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे श्रमजीवी संघटनेने उघडकीस आणले असून अशा बोगस कामांची चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी सात आठवडे १०१ मजूर कामावर असल्याचे दाखवले. प्रत्यक्ष ३७ मजूर बोगस नोंदवले गेले आहेत आणि त्यांची नावे रोहयोच्या संकेतस्थळावरही आहेत. याउलट, काम केलेल्या ३८ मजुरांना मजुरीपासून वंचित ठेवले गेले.
श्रमजीवी संघटनेच्या विक्रमगड तालुक्याचे सचिव कैलास तुंबडा यांनी सोमवारी गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. तरीही त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यानंतरदेखील बोगस नावे नोंदविली गेली. बोगस मजुरांच्या खात्यात पैसे जमा झाले आणि ते उचललेदेखील गेले.
श्रमजीवीचे विवेक पंडित आणि सहसचिव विजय जाधव यांनी कागदपत्रांसह पुराव्यानिशी सर्व माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केली. त्या सर्वांवर पांघरूण घालण्यासाठी गटविकास अधिकारी विश्वनाथ पिंपळे यांनी न केलेला पत्रव्यवहार रातोरात कागदपत्रांना जोडला. परंतु, त्याची जावक रजिस्टरमध्ये नोंद राहून गेल्याचे उघडकीस आल्याचा त्यांचा आरोप आहे.
या आधारेच या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)
१आलोंडे येथील दळवीपाडा रस्त्याचे काम दोन आठवड्यांपासून सुरू केल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात कोणत्याही कामाचा मागमूस तेथे दिसत नाही. पारदर्शकता आणि कार्यक्षम योजनेचे प्रतिक म्हणून ज्याचा गाजावाजा होतो, त्या संकेतस्थळावर सधनांची नावे मजूर म्हणून दिसतात. २देवनाथ मोहन भोईर एस्टीम कंपनीत कायमस्वरूपी कामावर आहेत. त्यांचेही नाव मजुरांच्या यादीत आहे. सुरेखा सुरेश बुंदे यांची स्वत:ची झडपोली येथे खानावळ आहे. त्यांनीही रोजगार हमीवर काम केल्याची नोंद आहे. ३संजय अगिवले हे विक्रमगडमधील स्वत: मजूर ठेकेदार आहेत. प्रशासनाने मात्र त्यांच्या कुटुंबाला मजूर दाखविले आहे. त्यांची अंथरुणाला खिळलेली आई सुनंदा कृष्णा अगिवले आणि वडील कृष्णा बंडू अगिवले रोहयोवर काम करतात अशा नोंदी आहेत. सदाशिव विष्णू अगिवले हे अपंग आहेत आणि ते कामाची प्रतीक्षा करत असून काम कधी सुरू होईल, याच्या चिंंतेत आहेत. पण, कागदोपत्री ते गेले दोन आठवडे कामावर असून भिवंडी येथे काम करणारा त्यांचा मुलगा मिलिंद अगिवले आणि मुलगी शुभांगी सदाशिव अगिवले येथील कामांवर दिसत आहेत.