Palghar Bypoll : मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण ऑडिओ ऐकवला; शिवसेनेचा डाव त्यांच्यावरच उलटवला! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 02:08 PM2018-05-26T14:08:23+5:302018-05-26T14:08:23+5:30

देवेंद्र फडणवीस यांनी क्लिपच्या सुरुवातीचा आणि शेवटचा भाग वसईतील जाहीर सभेत ऐकवला आणि शिवसेनेचा डाव त्यांच्यावरच उलटवला.

The Chief Minister heard the entire audio; Shivsena's turn was defeated by them! | Palghar Bypoll : मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण ऑडिओ ऐकवला; शिवसेनेचा डाव त्यांच्यावरच उलटवला! 

Palghar Bypoll : मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण ऑडिओ ऐकवला; शिवसेनेचा डाव त्यांच्यावरच उलटवला! 

googlenewsNext

वसईः पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत साम-दाम-दंड-भेद वापरण्याचा आदेश मुख्यमंत्री कार्यकर्त्यांना देत असल्याची क्लिप ऐकवून शिवसेनेनं शुक्रवारी खळबळ उडवून दिली होती. परंतु, आज देवेंद्र फडणवीस यांनी या क्लिपच्या सुरुवातीचा आणि शेवटचा भाग वसईतील जाहीर सभेत ऐकवला आणि शिवसेनेचा डाव त्यांच्यावरच उलटवला.

'आपण सगळ्या गोष्टी सांभाळण्याकरता सक्षम आहोत. आपण सरकार पक्ष आहोत. पण सत्तेचा कधीच दुरुपयोग करत नाही. मात्र, असा दुरुपयोग कुणी करायचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही, ही मानसिकता निवडणुकीत ठेवली पाहिजे', हे त्याच ऑडिओ क्लीपमधील पुढचे संवाद मुख्यमंत्र्यांनी ऐकवले आणि शिवसेनेवर पलटवार केला. पराभव दिसतो, तेव्हाच अशा स्तरावर जावं लागतं, साम-दाम-दंड-भेद याचा अर्थ कूटनीती असा होतो, असं सुनावत, आपण स्वतःच ही ऑडिओ क्लीप निवडणूक आयोगाला देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

पालघर पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात सध्या सुरू असलेले द्वंद्व अधिकच तीव्र झालंय. ही निवडणूक जिंकणे दोन्ही पक्षांसाठी किती प्रतिष्ठेचं झालं आहे, याचा प्रत्यय शुक्रवारी आला होता. याठिकाणी झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप ऐकवली. त्यातील मुख्यमंत्र्यांची भाषा ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 'ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही. कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते', असं मुख्यमंत्री म्हणाले होते. 

परंतु, शिवसेनेनं जी ऑडिओ क्लीप ऐकवली, ती अर्धवट असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी आज एकदा नव्हे, तर चार वेळा पुढचा भाग ऐकवला. कालच्या उद्धव ठाकरेंच्या सभेत हे भाषण ऐकवणाऱ्या आदेश बांदेकर यांचाही त्यांनी समाचार घेतला. सिद्धिविनायक संस्थानचा अध्यक्ष असलेल्यांनी जनाची नाही तर मनाची तरी ठेवायला हवी, असं त्यांनी सुनावलं. त्याचवेळी, त्याचं नाव आदेश आहे आणि तो आदेशानेच काम करतो, असा टोलाही हाणला. मी कधी तत्त्व सोडली नाहीत आणि सोडणारही नाही, असंही त्यांनी निक्षून सांगितलं. 

ही होती शिवसेनेने ऐकवलेली ऑडिओ क्लीप

एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे... आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल, तर आपण कशाप्रकारे रिअॅक्ट केलं पाहिजे?...

ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे, तो आता शांत बसूच शकत नाही...

आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे...

ज्यावेळी मी सांगतो तेव्हा हे लक्षात ठेवा... साम, दाम, दंड, भेद...

ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही. कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे...

तेव्हा तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे. 'अरे ला कारे'च करायचं. 'अरे ला कारे' मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे...

Web Title: The Chief Minister heard the entire audio; Shivsena's turn was defeated by them!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.