दशावताराचे अभ्यासक डॉ. तुलसी बेहेरे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:42 AM2018-01-07T00:42:47+5:302018-01-07T00:42:47+5:30
दशावताराचे गाढे अभ्यासक डॉ. तुलसी बेहेरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वसईतील डिसोझा हॉस्पिटल येथे शनिवारी सायंकाळी निधन झाले. ते ६५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात २ मुली आणि पत्नी असा परिवार आहे.
वसई : दशावताराचे गाढे अभ्यासक डॉ. तुलसी बेहेरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वसईतील डिसोझा हॉस्पिटल येथे शनिवारी सायंकाळी निधन झाले. ते ६५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात २ मुली आणि पत्नी असा परिवार आहे.
डॉ बेहेरे यांनी डॉ. रमेश कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली दशावतार या लोककला प्रकारावर पी. एच. डी. केली होती. महाराष्ट्रात दशावतारावर संशोधन करणारे ते पहीले संशोधक होते. लहानपणापासूनच त्यांच्यावर कोकणातील तुळस या जन्मगावी दशावताराचे संस्कार झाले होते. एक गुणी नट उत्तम दिग्दर्शक आणि अभ्यासू असणारे बेहेरे दशावताराचे व्यासंगी होते.
मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत ते मानद प्राध्यापक होते.ते मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये अधिकारी म्हणून सेवा निवृत्त झाले होते. जेष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या सोबत त्यांनी 'हें वंदन' हे नाटक केले. आय एन टी संस्थेत लोककलेच्या संवर्धनासाठी अशोक परांजपेंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन केले. त्यांचे राजा दशावतारी हे गाजलेले नाटक. तसेच राजा रूखमांगत, गरूडजन्म या नाटकांनी आधुनिक मराठी रंगभूमीवर आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांचा झेलम काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.
दशावतारात महिला काम करत नाहीत. पण, डॉ. बेहेरेंनी लोककला अकादमीत महिलांचा दशावतार बसवला. मराठी लोककला आणि लोकसाहित्याचे एक जाणकार अभ्यासक आणि मालवणी दशावताराचे उत्तम सादरीकरण करणारे कलावंत म्हणून बेहेरे अवघ्या महाराष्ट्राला परिचित होते.
मुंबई आकाशवाणीसाठी ही त्यांनी लोककलेसंबंधी अनेक मुलाखती घेतल्या आहेत. मी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
- डॉ. महेश केळुसकर
मालवणी भाषेवर आणि आपल्या तुळस या गावावर नितांत प्रेमकरणारा माझा मित्र आपल्यात नाही.डॉ. बेहेरेंनी राजा दशावतारी या नाटकाने स्वत:ची ओळख निर्माण केली.त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली
- गंगाराम गवाणकर
समाजाच्या कानाकोपºयात लोककला पोहोचण्यासाठी बेहरे यांनी आयुष्यभर काम केले. १९८० पासून आमचा स्नेह होता. नव्या पिढीपर्यंत लोककला पोहोचण्यात कायम उत्साही असणे हे बेहरे यांचे वैशिष्ट्य होय, त्यांची पोकळी कधीच भरुन निघणार नाही.
- प्रकाश खांडगे,
ज्येष्ठ लोककला अभ्यासक