हलगर्जी पोलिसांमुळे अपघातातील मृतदेहाचे हाल; पोस्ट अधिकाऱ्यांच्या अपघातामुळे प्रकरण चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 02:47 AM2018-04-21T02:47:53+5:302018-04-21T02:47:53+5:30
जव्हार पोलीस स्टेशनचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असून, अपघातात मृत्यु पावलेल्या मृतदेहाचे तब्बल आठ ते दहा तासांनी शवविच्छेदन करून शव ताब्यात दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी झालेल्या पोस्ट निरीक्षक पंतगे यांच्या मृतदेहाच्या वेळी पहावयास मिळाला.
- हुसेन मेमन
जव्हार : जव्हार पोलीस स्टेशनचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असून, अपघातात मृत्यु पावलेल्या मृतदेहाचे तब्बल आठ ते दहा तासांनी शवविच्छेदन करून शव ताब्यात दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी झालेल्या पोस्ट निरीक्षक पंतगे यांच्या मृतदेहाच्या वेळी पहावयास मिळाला.
गुरूवारी सकाळी १०.३० वा. दरम्यान, जव्हार पोस्टचे प्रभारी पोस्ट निरीक्षक विष्णू पतंगे व विरार पोस्टचे निरीक्षक प्रतीक कानडे हे दोन्ही मोखाडा पोस्ट आॅफिसच्या तपासणीसाठी बुधवारी मोखाडा येथे आले होते. ते गुरूवारी सकाळी आपल्या होंडा शाईन मोटार साईकलवरून जात असतांना कासटवाडी येथील वळणावर समोर येणाºया ठाणे- जव्हार बसने यांना जोरदार धडक दिल्यामुळे दोन्ही अधिकारी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना कुटीर रूग्णालय, जव्हार येथे दाखल केले असता, उपचारा दरम्यान पतंगे यांचे मृत्यु झाले तर प्रतिक यांना ठाणे जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
मात्र घटनेची वार्ता समजताच मृत पतंगेचे नातेवाईक व पोस्ट कार्यालयाचे कर्मचारी मृतदेह स्विकारण्यासाठी जव्हारमध्ये पोहोचले असता तेथे कुठल्याही प्रकारचा पंचनामा पोलीसांकडून करण्यात आलेला नव्हता. नातेवाईकांनी पंचनामा व शवविच्छेदन करून लवकर बॉडी मिळावी या करता पोलीस कर्मचाºयांना विनवण्या केल्या मात्र तेथे एकही पोलीस सायंकाळी सात वाजे पर्यंत फिरकला नाही. त्यावर लोकमतने पोलीस निरीक्षक डी. पी. भोये यांच्याशी संपर्क साधल्यावर तातडीने त्यांनी पंचनाम्यासाठी सहा. पोलीस निरीक्षक शेळकंदे व कर्मचारी यांना पाठवले. याचाच अर्थ मृत पावलेल्याकडून पण अर्थकारणाची अपेक्षा होती का? पोलीस पंचनामा लवकर करा हे बोलण्यासाठी कोणी येतो का? याची वाट पाहत होते का ? इतका उशीर का केला जातो ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
सकाळी १०.३० च्या घटनेचा पंचनामा व शवविच्छेदन करण्यासाठी जव्हार पोलीस अधिकाºयांना तब्बल आठ ते दहा तास लागत असल्यामुळे त्यांच्या कामाकाजावर प्रश्न चिन्ह निर्मिण होत आहे. असे अनेक प्रकार पोलीस अधिकारी व कर्मचाºयांकडून होत असुन दिरंगाई करणाºयांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मृत कुटूंबीयांच्या नातेवाईकांकडून होत आहे.
यापूर्वी दि. ११ एप्रिल रोजी पाचबत्ती येथे प्राथमिक आरोग्य केंद्र साखरशेतच्या अॅम्ब्युलन्सच्या मद्यधुंद वाहकाने धडक देऊन मुद्दसर व फक्रुद्दीन मुल्ला दोघा भावांना गंभीर जखमी केले होते. त्यातील एकाची प्रकृती खुपच खालावलेली आहे. मात्र, त्या रात्री पोलीस ठाण्यात फक्त एक पुरूष व एक महिला कर्मचारी उपस्थित असल्याने तातडीने वाहन चालकाचे अल्कोहोल तपासणी करणे आवश्यक होते, त्याच्या तोंडातून दारूचे खुपच वास येत असल्याचे प्रत्यक्ष दर्शणी लोकांनी सांगितले. मात्र पोलीसांनी त्याची वैद्यकीय तपासणी रात्री उशीरा पर्यत न केल्यामुळे संतप्त जमावाने मोठी घोषणाबाजी केली होती. त्यावेळी रात्री २.१० च्या सुमारास पोलीस निरक्षीक पोलीस ठाण्यात आले व त्यांनी स्वत: चालकाला वैद्यकीय तपासणी करीता नेले. त्यांना या घटनेबाबत रात्री १२.०० च्या दरम्यान कळविले होते मात्र, तरीही ते थेट जमाव जास्त झाल्यावर रात्री पोलीस ठाण्यात हजर झाले होते. मात्र सकाळी ११.०० च्या दरम्यान त्याला तातडीने न्यायालयात हजर सुध्दा केले व त्याचा जामीनही तातडीने झाला. याचाच अर्थ पोलीस त्या वाहन चालकाला बाहेर काढण्यासाठी स्वत: मदत करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. जव्हारचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश घाडगे यांनी यावर ‘ या घटने बाबत माहिती नसल्याचे सांगून मी चौकशी करुन योग्य ती कारवाई करतो’ असे लोकमतशी बोलतांना सागितलेले.
या घटनेबाबत मला कल्पना नव्हती. योग्य ती चौकशी करून पुढील कार्यवाही करतो - सुरेश घाडगे, उपविभागिय पोलीस अधिकारी.