वेलंकनी परिसरात अनैतिक व्यवसाय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 12:21 AM2018-08-24T00:21:48+5:302018-08-24T00:22:16+5:30
अनैतिक व्यवसायांमुळे तीर्थमंदिराचे पावित्र्य नष्ट होऊन गावातील मुलामुलींवर या सर्वांचे वाईट परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
मीरा रोड : उत्तन येथील प्रसिद्ध वेलंकनी तीर्थमंदिर परिसरात फोफावलेल्या बेकायदा हॉटेलांमधून वेश्या व्यवसाय, हुक्का, मद्यपान, डीजेचा धिंगाणा व अश्लील प्रकारांमुळे ग्रामस्थ संतापले असून याविरोधात बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवण्याची तयारी सुरू केली आहे. या अनैतिक व्यवसायांमुळे तीर्थमंदिराचे पावित्र्य नष्ट होऊन गावातील मुलामुलींवर या सर्वांचे वाईट परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
उत्तनगाव हे मच्छीमारांचे. भाटेबंदर येथील समुद्राजवळ निसर्गरम्य ठिकाणी असलेले ख्रिस्तीबांधवांचे वेलंकनी तीर्थमंदिर हे अत्यंत पवित्र व श्रद्धेचे ठिकाण मानले जाते. केवळ ख्रिस्तीच नव्हे तर हिंदू, मुस्लिमही आवर्जून येतात. पूर्वी भाटेबंदर हे समुद्रकिनारा असूनही दुर्लक्षित होते. परंतु, वेलंकनीमातेचे तीर्थमंदिर म्हणून जगभर ख्याती झाली आणि आज मोठ्या संख्येने नागरिक येऊ लागले. वेलंकनीमातेचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात असतो.
बीचवर येणाऱ्या जोडप्यांचे चालणारे अश्लील चाळे, खुलेआम चाललेले मद्यपान, समुद्रात बुडण्याच्या वाढत्या घटना नेहमीच्याच. पण, मागील काही काळापासून या ठिकाणी सरकारी व खाजगी जागेत झालेल्या बेकायदा हॉटेलांमध्ये बेकायदा मद्यविक्री, हुक्का यासह डीजेच्या तालावर धिंगाणा चालत आहे. रात्री उशिरापर्यंत डीजे चालतो.
पोलीस हॉटेलांमध्ये कधीतरी कारवाई करून खानापूर्ती करतात, तर बहुतांश स्थानिक नेते तसेच ग्रामस्थही याकडे गांभीर्याने पाहत नव्हते. तीर्थमंदिराजवळील मॅजिक किचन या एका बेकायदा हॉटेलमधून मद्यपुरवठ्यासह वेश्या व्यवसाय चालत असल्याचा प्रकार नुकताच सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी उघड केला. वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या तीन मुलींची सुटका केली आहे, तर हॉटेलच्या चौघांना अटक करून साडेबावीस हजारांची दारू जप्त केली.
गिल्बर्ट गौरया व भाटेबंदर युवा संघटनेचे कॅझिटन गोजी व सदस्यांमध्ये यावर चर्चा सुरू आहे. तीर्थमंदिर सुकाणू समितीचे अध्यक्ष रेनॉल्ड बेचरी यांनीही संघटना ग्रामस्थांची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
बेकायदा बांधकामांवर कारवाई का नाही?
पोलिसांनी सातत्याने येथील अनैतिक व गैरकृत्यांवर कारवाई करावी. हॉटेलांची बांधकामे बेकायदा असून सरकारी जमिनी व सीआरझेडमध्ये आहेत. लाखो रुपयांची भाडी घेतली जात आहेत. ग्रामस्थांना स्वत:चे घर बांधायचे तर अडचणी येतात. मग, यांच्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी केला. बैठकीनंतर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे रेनॉल्ड बेचरी म्हणाले.