अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या आणि प्रस्ताव मंजूर झाले नसताना उभारलेल्या स्टॉल प्रकरणी पालिकेने बजावल्या नोटिसा
By धीरज परब | Published: May 13, 2024 11:28 PM2024-05-13T23:28:54+5:302024-05-13T23:29:14+5:30
सदर घोटाळ्यातील काही स्टॉल धारकांनी लावलेले स्टॉल रातोरात हलवल्याचे समोर आले आहे.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या केलेले १४ स्टॉल परवान्यांचे प्रस्ताव व शुल्क भरण्याची पत्रं सापडल्या प्रकरणी महापालिकेने स्टॉल धारकांना नोटिसा बजावल्या आहेत. ह्या स्टॉल घोटाळ्या प्रकरणी अजूनही पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी मात्र टाळाटाळ होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सदर घोटाळ्यातील काही स्टॉल धारकांनी लावलेले स्टॉल रातोरात हलवल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या मालमत्ता विभागात एक फायलींचा गठ्ठा सापडल्या नंतर त्यात हा स्टॉल घोटाळा उघडकीस आला आहे. त्यात १४ जणांना स्टॉल मंजुरीच्या प्रस्तावांवर उपअभियंता चेतन म्हात्रे व शहर अभियंता दिपक खांबित यांच्या बनावट साह्य आढळून आल्या. तर सुनील नामदेव अहिरे, दुर्गादास अहिरे, दीपाली अहिरे, दामिनी अहिरे, सिंधुताई भदाने, रोशन शंकर पटेल, विशाल तुकाराम राऊत, स्वप्नाली राऊत, सुखदेव विठ्ठल सुरंजे, राजेंद्र सोनू महाले, राखी महाले, भगवती मधेसीया, गुंजा ठाकूर, सीमा उमाशंकर ठाकूर ह्या १४ जणांच्या नावाने भाडेशुल्क भरण्या बाबतचे महापालिकेचे पत्र व त्यावर खांबित यांची बनावट सही आढळून आली.
सदर स्टॉल हे फास्टफूड, ज्यूस, मोबाईल साहित्य आदी प्रकारचे असून तसे स्टॉल नियमात नाहीत. तर स्टॉल लावण्याचा अंतिम परवाना मिळाला नसताना मुख्य वर्दळीच्या ठिकाणी स्टॉल थाटून बक्कळ कमाई चालवण्यात आली.
ह्या प्रकरणी महापालिकेने एकीकडे अजूनही पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवलेली नाही. तर दुसरीकडे सदर स्टॉल धारकांच्या नावाने पालिकेने नोटिसा जारी केल्या असल्या तरी प्रत्यक्षात जागेवर केवळ ५ स्टॉलच आढळले असल्याचे सूत्रांनी सांगितले. काहीजणांना कारवाईची कुणकुण लागताच त्यांनी रातोरात स्टॉल उचलून नेले. तर ३ - ४ स्टॉलवर पालिकेने आधीच कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले.