आता ६१ दिवस मासेमारी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:54 AM2018-06-02T00:54:24+5:302018-06-02T00:54:24+5:30
१ जून ते ३१ जुलै या आगामी ६१ दिवसांच्या कालावधी करिता सागरी मासेमारी बंदीचा कालावधी असणार आहे
बोर्डी : १ जून ते ३१ जुलै या आगामी ६१ दिवसांच्या कालावधी करिता सागरी मासेमारी बंदीचा कालावधी असणार आहे. तथापी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय आयुक्तालय ठाणे-पालघर या अंतर्गत येणारी उत्तन, वसई, एडवन, सातपाटी आणि डहाणू या परवाना विभागातील सुमारे बावीसशे नोंदणीकृत यांत्रिक बोटी आहेत. तर पारंपरिक बोटींना ही बंदी लागू नसली तरी या काळात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे खबरदारी बाळगत पारंपरिक बोटीही किनाºयावर शाकारण्यात येतात.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत १ जून ते ३१ जुलै हा ६१ दिवसांचा बंदीचा कालावधी आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्याकरिता पालघर येथे सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय आयुक्तालयाचे कार्यालय आहे. त्या अंतर्गत पाच परवाना अधिकाºयांचे कार्यक्षेत्र आहे. त्या नुसार उत्तन (वाशी ते वसई), वसई(पाचूबंदर ते अर्नाळा), एडवन(वडराई ते एडवन), सातपाटी ( शीरगाव त तारापूर) आणि डहाणू विभागात वरोर ते झाई) या सागरी क्षेत्रांचा समावेश आहे. या मुख्यालयाअंतर्गत २२०० यांत्रिक मासेमारी बोटींची नोंदणी झालेली आहे. पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ असल्याने ही बंदी लागू असते. शिवाय जोराचा पाऊस आणि वादळी वारे यामुळे जीवित व वित्तहानी होण्याचा धोका असतो. त्यामुळे मच्छीमार या काळात हा नियम कसोशीने पाळतात. तथापि किनार्यावर नांगरलेल्या बोटी प्लास्टिक किंवा झावळ्यांंनी शाकारण्यात येतात.
पालघर जिल्ह्यातील सागरी क्षेत्र मासेमारीचा गोल्डन बेल्ट समजला जातो. पापलेट, सरंगा, घोळ, दाढा, कोळंबी, शिवंड आदी विविध जातींचे मासे विदेशी चलन प्राप्त करून देतात. मात्र, मागील दशकापासून माशांच्या प्रमाणात कामालिची घट झाल्याने या व्यवसायिकांवर आणि त्यावर अवलंबून पूरक व्यावसायिक आर्थिक झळ सोसत आहेत. शिवाय ऐन मासेमारी हंगामात येणारी वादळांमुळे मासेमारी बंद ठेवावी लागते. तर डिझेल दरवाढ, त्याला शासनाकडून योग्य प्रमाणात न मिळणारी सबिसडी, हमीभावाचा अभाव या मुळे मच्छिमार आर्थिक संकटात आहेत.