डहाणूजवळ ‘राम प्रसाद’ नौका बुडाली; दहा खलाशी बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 11:33 PM2017-08-30T23:33:05+5:302017-08-30T23:33:05+5:30
गुजरातच्या नवाबंदरातून डहाणूच्या समुद्रात मासेमारीसाठी आलेली ‘राम प्रसाद’ ही नौका बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास वादळी वा-यात सापडून बुडाल्याचे वृत्त असून त्यातील १० खलाशी अद्याप बेपत्ता आहेत.
- हितेन नाईक ।
पालघर : गुजरातच्या नवाबंदरातून डहाणूच्या समुद्रात मासेमारीसाठी आलेली ‘राम प्रसाद’ ही नौका बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास वादळी वा-यात सापडून बुडाल्याचे वृत्त असून त्यातील १० खलाशी अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेची माहिती तटरक्षक दलाला कळविल्याचे पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
नवा बंदरातून २५ आॅगस्ट रोजी रामा सामंत यांच्या मालकीची ‘राम प्रसाद’ ही नौका मासेमारीसाठी आपल्या बंदरातून रवाना झाली होती. सामंत यांचा भाचा दिनेशभाई बच्चू भाई बामणीया हे नौकेचे तांडेल आपल्या पाच सहकाºयांसह घागरा पद्धतीने मासेमारी करण्यासाठी बुधवारी पहाटे डहाणूच्या समुद्रात जीपीएस पॉर्इंट १९५०७२०० या क्र मांकावर आले असताना समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वारे आणि लाटांच्या तडाख्यात सापडले. समुद्रात ६० किमी वेगाने वादळी वारे वाहत असल्याचा इशारा देत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असे प्रशासनाने कळविले होते. मात्र, पाच दिवस आधीच समुद्रात मासेमारीला गेलेल्या ‘राम प्रसाद’ या नौकेला हा मेसेज पोहोचू शकला नाही. या अपघातात समुद्रात फेकले गेलेल्या दहा मच्छीमारांना शेजारी मासेमारी करणाºया ‘प्रेम साई’ या नौकेतील खलाशांनी वाचिवल्याची माहिती पुढे येत आहे. ही बोटही बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. दुर्घटनेबाबतची माहिती आम्हाला ‘व्हॉट्सअप’द्वारे कळल्याचे नौकेचे मालक राम प्रसाद यांनी ‘लोकमत’ला सांगितले.