गोराड परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 12:42 AM2019-10-21T00:42:45+5:302019-10-21T00:42:54+5:30
वर्षभरापासून निंबवली - केळठण रस्त्यावर येथील मोरीला मोठे भगदाड पडले आहे.
वाडा : वर्षभरापासून निंबवली - केळठण रस्त्यावर येथील मोरीला मोठे भगदाड पडले आहे. आता हे भगदाड अधिक रुंदावले असून ते अधिक धोकादायक बनले आहे. यामुळे वाडा तालुक्यातील गोराड, नांदनी, निंबवली या आदिवासी तसेच दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.
नांदणी, गोराड, निंबवली येथील ग्रामस्थ तसेच विद्यार्थी यांच्यासाठी गणेशपुरी येथे बाजारहाट करण्यासाठी आणि शाळेत जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. पण, सध्या या रस्त्यामुळे येथून वाहन चालविणे मोठे धोक्याचे बनले आहे.
वाडा सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत हा रस्ता येतो. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तसेच मोरीवर पडलेल्या खड्ड्यांबाबत येथील ग्रामस्थांनी वारंवार तक्र ारी केलेल्या आहेत. पण या तक्र ारींची दखल आजवर घेतली गेलेली नाही. निंबवली येथे सहशिक्षक असलेले महेश काचरे यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने या धोकादायक खड्ड्याच्या आजूबाजूला दगड ठेवून पुढे धोका असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही धोका टळला असून तातडीने याचे काम करण्याची मागणी नागरिक करत आहेत.