ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीचे तंत्रज्ञान; डहाणूच्या कोसबाड येथील कृषि विज्ञान केंद्रात यशस्वी प्रात्यक्षिक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 07:32 PM2021-09-14T19:32:43+5:302021-09-14T19:33:30+5:30
पालघर जिल्ह्यातील चिकू, आंबा आणि नारळ बागांसाठी वरदान ठरणार असल्याचा व्यक्त केला जातोय विश्वास
अनिरुद्ध पाटील
डहाणूतील कृषि विज्ञान केंद्र कोसबाड हिल येथे चेन्नईतील गरुडा एरोस्पेस प्रा. लि. कंपनी यांच्या सहाय्याने ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक यशस्वी झाले. हे तंत्रज्ञान पालघर जिल्ह्यातील चिकू, आंबा आणि नारळ बागांसाठी वरदान ठरणार आहे. या यशस्वी ड्रोन उड्डाणामुळे फळबागायतींवर कमी वेळ व खर्चात फवारणी शक्य होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.
कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्र आणि चेन्नईतील गरुडा एरोस्पेस प्रा. लि. कंपनी यांच्या सहाय्याने या विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पडले. एका वेळी 10 लिटर एवढ्या क्षमतेने 500 मीटरपर्यंत ड्रोनची फवारणीची क्षमता आहे. या प्रत्यक्षिकात नारळाच्या उंच झाडावरून मानवरहीत फवारणी तंत्रज्ञान पाहून उपस्थित शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी या कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी शेती क्षेत्रात ड्रोन वापराचे महत्त्व पटवून दिले. मनुष्यबळाची कमतरता, वेळ आणि श्रम वाचविणे, फळ झाडांची अती उंची, यावर उपाय म्हणून ड्रोनद्वारे फवारणी उपयोगी असल्याचे त्यांनी सांगितले. या तंत्रज्ञानाच्या वापराने एकरी औषध कमी लागणार असून केवळ 15 मिनिटात एक एकर क्षेत्रावर फवारणी करता येते. या कार्यक्रमास गरूडा एरोस्पेस कंपनीचे पायलट विजय नारायणन, सह पायलट अँटोनी जेगस्टीन तसेच कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उत्तम सहाणे, रूपाली देशमुख, अनुजा दिवटे, रिझवान सय्यद, अनिलकुमार सिंग, प्रशांत वराठा, प्रसाद कासले, दामिनी, लीनिता तांडेल आदी उपस्थित होते.