सफाळ्यात वाचकांसाठी १५ हजार पुस्तकांचा खजिना, ८ ते १८ नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 04:14 AM2017-11-12T04:14:40+5:302017-11-12T04:14:57+5:30
सोशल मीडिया, टीव्हीच्या जंजाळात अडकून वाचन संस्कृती लयास जात आहे. त्यामुळे ही संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सफाळे येथील प्रगती प्रतिष्ठानने १५ हजार पुस्तकांचा खजिना वाचकासाठी खुला केला असून त्याचे उद्घाटन प्रविण राऊत ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
पालघर : सोशल मीडिया, टीव्हीच्या जंजाळात अडकून वाचन संस्कृती लयास जात आहे. त्यामुळे ही संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सफाळे येथील प्रगती प्रतिष्ठानने १५ हजार पुस्तकांचा खजिना वाचकासाठी खुला केला असून त्याचे उद्घाटन प्रविण राऊत ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
मनोविकास बुक सेंटर आणि प्रगती प्रतिष्ठान, सफाळे यांच्या विद्यमाने सफाळ्यातील देवभूमी सभागृहात ८ ते १८ नोव्हेंबरपर्यंत भव्य स्वरूपात पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी जेष्ठ पत्रकार समीर मणियार, उपसरपंच राजेश उर्फ बंटी म्हात्रे, शिक्षण संस्थेचे कांतीलाल दोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
व्हॉट्सअॅप, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या चक्र व्यूहात शैक्षणिक पातळी घसरू लागली असून ब्लू व्हेल सारख्या सोशल मीडिया वरील गेममुळे अनेक तरु ण आत्महत्येचे टोक गाठू लागले आहेत. गावागावातील, शाळातील लायब्ररी ओस पडू लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण, विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी ह्यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेतील मान्यवर लेखकांची सुमारे १५ हजार पुस्तके असलेले भव्य प्रदर्शनाचा स्तुत्य उपक्रम सफाळ्यात राबविला जात आहे.
मनोविकास, मेहता, राजहंस, रोहन, ज्योत्स्ना, नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी, आदी नावाजलेल्या प्रकाशकांची अनेक पुस्तके प्रदर्शन सकाळी १० ते ९ ह्या वेळेत उपलब्ध होणार असल्याचे उन्मेष कुलकर्णी यांनी सांगितले.