१२ गावांचे टँकर प्रस्ताव लालफितशाहीत !

By Admin | Published: May 27, 2017 07:48 PM2017-05-27T19:48:26+5:302017-05-27T19:48:26+5:30

गतवर्षी २२ गावांत टँकरने होता पाणीपुरवठा : यावर्षी एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा नाही, दिरंगाईचा फटका.

12 villages tanker offer redfish! | १२ गावांचे टँकर प्रस्ताव लालफितशाहीत !

१२ गावांचे टँकर प्रस्ताव लालफितशाहीत !

googlenewsNext

मंगरूळपीर : गतवर्षी टँकरग्रस्त असलेल्या २२ गावांपैकी जवळपास १९ गावांत यावर्षीही पाणीटंचाई जाणवत आहे. यापैकी १२ गावांनी टँकरचे प्रस्ताव सादर केल्यानंतरही अद्याप या प्रस्तावांना मंजुरात मिळालेली नाही. केवळ तीन गावांत विहिर अधिग्रहण करण्यात आले आहे.
उन्हाळ्याला सुरूवात झाली की टंचाईग्रस्त गावांत पाणीटंचाईची दाहकता वाढते. मंगरूळपीर तालुक्यातही पाणीटंचाईने काही गावांना होरपळून जावे लागते. गतवर्षी तालुक्यातील इचोरी, भूर, कळंबा बोडखे, सोनखास, शहापूर खु., मोझरी, तऱ्हाळा, बिटोडा भोयर, कासोळा, झाडगाव, पांग्री महादेव, अरक, घोटा, पोघात, शिवणी रोड, रामगढ, नांदगाव, लही, मोहगव्हाण, बेलखेड, बालदेव, सायखेडा अशा २२ गावांत तिव्र पाणीेटंचाई निर्माण झाली होती. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपरोक्त २२ गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावर्षी तालुक्यातील एकाही गावात अद्यापपर्यंत टँकर सुरू झाले नाही. तथापि, टँकरची आवश्यकता असल्याबाबतचे प्रस्ताव, गतवर्षी टँकरग्रस्त असलेल्या १२ गावांनी दिलेले आहेत. मात्र, एकाही ठिकाणी टँकर सुरू झाले नाही. गतवर्षी टँकरग्रस्त असलेल्या कळंबा बोडखे, शहापूर खु., सोनखास, बालदेव, तऱ्हाळा, पांग्री महादेव, कासोळा, घोटा, मोझरी, वसंतवाडी, दाभा, सायखेडा आदी १२ गावांत सद्यस्थितीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. येथे टँकरने पाणीपुरवठा करावा, असे प्रस्ताव दिलेले आहेत. असे असतानाही प्रशासन टँकरने पाणीपुरवठा का करीत नाही? असा सवाल तेथील जनतेने उपस्थित केला आहे. पाणीटंचाई असतानाही, टँकर सुरू न केल्याने पाणीटंचाई दूर झाल्याबद््दल धूळफेक तर केली जात नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे. गतवर्षी टँकर सुरू असलेल्या पोघात, भूर, शिवनी या तीन गावांत यावर्षीदेखील पाणीेटंचाई असल्याने येथे टँकर सुरू न करता विहिर अधिग्रहण करण्यात आले आहे. या तीन गावांत विहिर अधिग्रहण करून पाणीटंचाईची धग कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गतवर्षी टँकरग्रस्त असलेल्या जांब, बेलखेड, पांग्री महादेव, तऱ्हाळा, दाभा यासह सर्वच गावातील नागरिकांना यावर्षीदेखील दूरवरून पाणी आणावे लागत आहे. 
कळंबा बोडखे येथील नागरिकांना दूरवरून पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. शहापूर खु., सोनखास गावात जलस्त्रोत नसल्याने आणि टँकरने पाणीपुरवठा नसल्याने घोटभर पाण्यासाठी नागरिकांना मैलभर भटकंती करण्याची वेळ आली आहे. तालुक्यात यावर्षी मे महिना संपत आला तरी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांवर प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून येते. 
यावर्षी लाठी, चांभई, धानोरा, हिरंगी, भुर, जनुना, पारवा, पोटी,  शिवनी, मजलापुर, चेहेल, पोघात, धोत्रा, साळंबी, भडकुंभा, चिखली आदी गावांत विहिर अधिग्रहण करण्यात आले आहे. 

गतवर्षी २२ गावांतील टँकरवर ८७.७१ कोटींचा खर्च 
गतवर्षी मंगरूळपीर तालुक्यातील इचोरी, भूर, कळंबा बोडखे, सोनखास, शहापूर खु., मोझरी, तऱ्हाळा, बिटोडा भोयर, कासोळा, झाडगाव, पांग्री महादेव, अरक, घोटा, पोघात, शिवणी रोड, रामगढ, नांदगाव, लही, मोहगव्हाण, बेलखेड, बालदेव, सायखेडा अशा २२ गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. यावर ८७ कोटी ७१ लाख रुपयांचा खर्च झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या दप्तरी आहे.

यावर्षी १२ गावांचे टँकरसाठी प्रस्ताव
गतवर्षी टँकरने पाणीपुरवठा सुरू असलेल्या २२ गावांपैकी यावर्षी १२ गावांनी टँकरचे प्रस्ताव सादर केले आहेत. यामध्ये कळंबा बोडखे, शहापूर खु., सोनखास, बालदेव, तऱ्हाळा, पांग्री महादेव, कासोळा, घोटा, मोझरी, वसंतवाडी, दाभा, सायखेडा या १२ गावांचा समावेश आहे. मात्र, अद्याप टँकरने पाणीपुरवठा सुरू न झाल्याने तेथे पाणीटंचाई जाणवत आहे.

शहापूर, सोनखास येथील पाणीटंचाई लक्षात घेवुन मागील महिन्यात टँकरसाठी प्रस्ताव तहसील कार्यालयात पाठविला आहे. मात्र या प्रस्तावाची अद्यापपर्यंत दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या लक्षात घेवुन लवकर टँकर सुरु करणे अपेक्षी आहे. 
- रेखा गजानन नाईक 
सरपंच, जांब गटग्रामपंचायत
बेलखेड येथे गतवर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यावर्षी पाणीटंचाई भेडसावत आहे. गावातील काही जलस्त्रोतातील पाण्याचा वापर करून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गावातील एकाही विहिरीला मुबलक पाणी नसल्यामुळे विहिर अधिग्रहण करणे शक्य नाही. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे.
- सुरेखा ठाकरे,
सरपंच, बेलखेड
 ग्राम पंचायतने चिखलगाड येथील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेवुन याबाबतचा प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयास सादर केला आहे. परंतु अद्याप याबाबत आदेश प्राप्त नाहीत.
- एस.एम.शिंदे, सचिव चिखलागड
यावर्षी पाणीटंचाई असतानाही टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला नाही. पाण्याचा काटकसरीने वापर सुरू आहे. 
राजू ठोंबरे, 
नागरिक, बेलखेड.

Web Title: 12 villages tanker offer redfish!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.