हमीपत्राच्या जाचक अटींमुळे गोरगरीब लाभार्थी केरोसीनपासून वंचित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 01:32 PM2018-12-30T13:32:06+5:302018-12-30T13:32:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : हमीपत्राच्या जाचक अटींमुळे गारगरीब लाभार्थी केरोसीनच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा प्रकार केरोसीन परवानाधारकांच्या तक्रारीने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : हमीपत्राच्या जाचक अटींमुळे गारगरीब लाभार्थी केरोसीनच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा प्रकार केरोसीन परवानाधारकांच्या तक्रारीने समोर आणला आहे. रिसोड तहसिलच्या पुरवठा विभागाने तोंडी आदेशाद्वारे लागू केलेली हमीपत्राची जाचक अट रद्द करावी आणि सप्टेंबर २०१८ च्या हमीपत्रानुसार केरोसीनच्या पुरवठा करावा, अशी मागणी परवानाधारकांनी २९ डिसेंबरला जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली.
गॅस सिलिंडर जोडणी नसलेल्या लाभार्थींना केरोसीन मिळण्यासाठी हमीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. रिसोड तालुक्यातील किरकोळ केरोसीन परवानाधारकांनी केरोसीनसाठी पात्र कार्डधारकांकडून सप्टेंबर २०१८ मध्ये तहसिल कार्यालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. परंतू, या हमीपत्रानुसार आॅक्टोबर आणि डिसेंबर महिन्यातही केरोसीनचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे ग्राहक हे केरोसीनपासून वंचित राहत आहेत, असे निवेदनात नमूद आहे. जाचक अटी लादल्यामुळे केरोसीनच्या कोट्यात प्रचंड कपात झाली आहे. सध्या १४ ते १६ तासापर्यंत वीजभारनियमन घेतले जात आहे. त्यामुळे केरोसीनची आवश्यकता भासत असल्याने कार्डधारक हे केरोसीनसाठी तगादा लावत आहेत. वरिष्ठ स्तरावरून पुरेशा प्रमाणात केरोसीन येत नसल्याने पात्र लाभार्थींना केरोसीन द्यावे तरी किती? असा पेच निर्माण होत आहे. कधी कधी तर कार्डधारकांशी किरकोळ वादही उद्भवत आहे. त्यामुळे केरोसीन परवानाधारकांनी सप्टेंबर २०१८ मध्ये तहसिल कार्यालयात सादर केलेल्या हमीपत्रानुसार केरोसीन देण्याची मागणी किरकोळ केरोसीन पुरवठाधारक संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे केली.
तलाठ्यांना तोंडी आदेश
कार्डधारकांनी हमीपत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर सदर हमीपत्र साक्षांकित करण्याचे तोंडी आदेश तलाठ्यांना देण्यात आले आहेत. मात्र, हमीपत्रावर कार्डधारकांची स्वाक्षरी साक्षांकित करण्यासाठी तलाठी तयार नाहीत. त्यामुळे पेच निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद आहे. पात्र कार्डधारकांनी गॅस नसल्याबाबतचे प्रमाणपत्र हे गॅस एजन्सीकडून आणावे, असाही फतवा काढला आहे. मात्र, पुरवठा विभागाकडून कोणतेही लेखी आदेश किंवा सूचना देण्यात आली नाही. त्यामुळे लाभार्थींची गैरसोय होत असून, याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी केरोसीन परवानाधारकांनी जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली.
सामुहिक राजीनाम्याचा इशारा
हमीपत्राची जाचक अट रद्द करावी, हमीपत्रासंदर्भात दिलेल्या तोंडी आदेश किंवा सूचना मागे घेण्यात याव्या आणि लाभार्थींनी दिलेल्या सप्टेंबर २०१८ च्या हमीपत्राच्या अनुषंगाने केरोसीन पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करतानाच पात्र लाभार्थींना देय असलेले केरोसीन पुरेशा प्रमाणात मिळत नसेल आणि हमीपत्राच्या जाचक अटींमुळे केरोसीनच्या कोट्यात प्रचंड कपात केली जात असेल तर नाईलाजास्तव सामुहिक राजीनामे द्यावे लागतील, असेही निवेदनात परवानाधारकांनी नमूद केले आहे.
केरोसीन आणि हमीपत्र यासंदर्भा नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जातील.
-देवराव वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम