पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 01:06 AM2017-09-19T01:06:47+5:302017-09-19T01:06:58+5:30
वाशिम: दिवसागणिक पेट्रोल व डिझेलच्या किमतीत भरमसाट वाढ केली जात असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणार्या विद्यमान सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास झाला असल्याचा आरोप करीत पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

गेल्या दीड महिन्यात पेट्रोल व डिझेल दरात सुमारे ५0 टक्के वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेत बॅरेलच्या दरामध्ये घसरण होत असताना राज्यात मात्र पेट्रोल व डिझेल दरवाढीचा भडका उडाला. यास सर्वार्थाने विद्यमान शासनच कारणीभूत असल्याचा मुद्दा समोर करत काँग्रेसने सोमवारी जिल्हय़ातील मालेगाव, मंगरूळपीर, मानोरा आणि कारंजा या चार तालुक्यांमध्ये निदर्शने आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला, तर रिसोड येथे मंगळवारी आणि वाशिममध्ये बुधवारी आंदोलन केले जाणार आहे.
यासंदर्भात प्रशासनाकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे, की पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढतच आहेत. १७ जुलै रोजी पेट्रोलचा प्रतिलीटर दर ६३ रुपये होता. तो सध्या तब्बल ८0 रुपये प्रतिलीटरवर पोहचला आहे. जागतिक बाजारात बॅरेलच्या दरात सातत्याने घसरण होत असताना राज्यात मात्र इंधन दरात होत असलेल्या दरवाढीमुळे दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे दर भरमसाट वाढले आहेत. दरम्यान, स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ रद्द करावी, पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावे, आदी मागण्या काँग्रेसने केल्या.