वाशिम जिल्ह्यातील व्यापारपेठांमधील व्यावसायिकांकडून १० रुपयांची नाणी स्विकारण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 04:59 PM2018-02-12T16:59:09+5:302018-02-12T17:03:47+5:30
वाशिम : रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणलेली १० रुपयांची सर्वच नाणी वैध असून ते बिनदिक्कतपणे स्विकारण्यात यावे, असे संदेश ‘आरबीआय’कडून नागरिकांच्या मोबाईलवर पाठवून जनजागृती केली जात आहे. मात्र, त्याकडे कानाडोळा करून वाशिम जिल्ह्याच्या व्यापारपेठेतील बहुतांश व्यावसायिकांकडून ही नाणी स्विकारण्यास ग्राहकांना नकार दिला जात आहे. यामुळे ज्यांच्याकडे १० रुपयांची नाणी पडून आहेत, ते नागरिक पुरते वैतागले असून ही समस्या निकाली काढण्याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष पुरविणे गरजेचे असल्याचा सूर सर्वच स्तरांतून उमटत आहे.
१० रुपयांची १४ प्रकारची नाणी चलनात असून त्यापैकी कुठल्याच नाण्यावर अद्याप बंदी लादण्यात आलेली नाही, असे ‘आरबीआय’ने १७ जानेवारी २०१८ ला स्पष्ट करून नागरिकांना यासंदर्भात जनजागृतीपर संदेशही पाठविले आहेत. असे असतानाही वाशिम जिल्ह्यातील व्यापारपेठांमधील बहुतांश व्यावसायिकांकडून १० रुपयांची नाणी स्विकारण्यास नकार दिला जात असल्याचे दिसून येत आहे.
‘रिकरिंग एजन्ट’ही स्विकारेना १० रुपयांचे नाणे!
दैनंदिन बचतीच्या हेतूने अनेक नागरिकांकडून विविध बँकांच्या ‘रिकरिंग एजन्ट’च्या माध्यमातून बँकेत पैसे टाकले जातात. मात्र, हे एजन्टही ग्राहकांकडून १० रुपयांचे नाणे स्विकारत नसल्याचा प्रकार घडत आहे. स्टेट बँक आॅफ इंडिया या बँकेतही आठवड्यातील केवळ बुधवारीच ही नाणी स्विकारली जातात. मात्र, या एकाच दिवशी ग्राहकांची झुंबड उडत असल्याने गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.