पात्र लाभार्थीचे ३० हजाराचे अनुदान दुसऱ्याच्याच बँक खात्यात केले जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 06:10 PM2018-07-24T18:10:33+5:302018-07-24T18:11:18+5:30
वाशिम- नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहणारी रिसोड पंचायत समिती पुन्हा एकदा घरकुल योजनेतील अनुदान वाटपावरून चर्चेत आली आहे.
- संतोष वानखडे
वाशिम- नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहणारी रिसोड पंचायत समिती पुन्हा एकदा घरकुल योजनेतील अनुदान वाटपावरून चर्चेत आली आहे. रिठद येथील एका लाभार्थीचे ३० हजार रुपयांचे अनुदान दुसºयाच लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्याचा प्रताप सन २०१७ मध्ये करण्यात आला. एक वर्षे लोटले तरी अद्याप चुकीची दुरूस्ती झाली नसल्याने पात्र लाभार्थीचे घराचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
‘सर्वांसाठी घरे’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ दिला जातो. या योजनेंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात रिठद ता. रिसोड येथील दुर्गा सोपान धुळधुळे, कमल ज्ञानबा धुळधुळे या दोन लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळाला. घरकुल बांधकाम करण्यासाठी अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून ३० हजार रुपये लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केले जातात. यासाठी लाभार्थींकडून अचूक बँक खाते मागविले जाते. दुर्गा सोपान धुळधुळे व कमल ज्ञानबा धुळधुळे यांनी अचूक बँक खाते क्रमांक दिल्यानंतर पंचायत समिती स्तरावरील संबंधित कर्मचाºयाने चुकीचे बँक खाते क्रमांक ‘फिडींग’ केल्याने अनुदान वितरणाचा घोळ निर्माण झाला. कमल ज्ञानबा धुळधुळे यांचे ३० हजार रुपयांचे अनुदान दुर्गा सोपान धुळधुळे यांच्या बँक खात्यात जमा झाले. तर दुर्गा धुळधुळे यांचे ३० हजार रुपयांचे अनुदान रिठद येथीलच अन्य एका प्रतिक्षा यादीतील लाभार्थीच्या बँक खात्यात जमा झाले. घरकुल बांधकाम करण्यासाठी अचूक बँक खात्यात ३० हजार रुपयांची रक्कम जमा झाली नसल्याने ही बाब गटविकास अधिकाºयांच्या निदर्शनात आणून देण्यात आली. एका वर्षानंतरही बँक खाते क्रमांकात दुरूस्ती झाली नसल्याने घरकुल बांधकामाचे स्वप्न धुळीस मिळाले. प्रतिक्षा यादीतील अन्य लाभार्थीच्या बँक खात्यात जमा झालेली ३० हजार रुपयांची रक्कम अद्याप पंचायत समिती प्रशासनाने परत घेतली नाही.
मी रिसोड येथे रूजू होण्यापूर्वीचे सदर प्रकरण आहे. बँक खाते क्रमांकाची दुरूस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे अद्याप दुरूस्ती झाली नाही. दुसºया लाभार्थीच्या बँक खात्यात चुकीने जमा केलेली ३० हजार रुपयांची रक्कम परत मिळावी, यासाठी नोटीस बजावली आहे. अद्याप त्या लाभार्थीने ३० हजार रुपये परत केले नाहीत. धुळधुळे या लाभार्थीला न्याय मिळावा यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे मार्गदर्शन मागविले आहे. घरकुलाचे अनुदान अचूक बँक खाते क्रमांकावर जमा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- शिवशंकर भारसाकळे, गटविकास अधिकारी, रिसोड.