१५ दिवसांत सोने ३६०० रुपयाने घसरले; अक्षय्य तृतियानिमित्त बुकींग तेजीत!

By संतोष वानखडे | Published: May 7, 2024 04:35 PM2024-05-07T16:35:50+5:302024-05-07T16:37:08+5:30

भारतीयांना सोन्याचे विशेष आकर्षण आहे.

gold falls by rs 3600 in 15 days booking for akshaya tritiya | १५ दिवसांत सोने ३६०० रुपयाने घसरले; अक्षय्य तृतियानिमित्त बुकींग तेजीत!

१५ दिवसांत सोने ३६०० रुपयाने घसरले; अक्षय्य तृतियानिमित्त बुकींग तेजीत!

संतोष वानखडे, वाशिम : मार्च व एप्रिल महिन्यात किमतीचा उच्चांक गाठणाऱ्या सोन्याचे भाव मे महिन्यात घसरणीला लागल्याचे दिसून येते. १५ दिवसांपूर्वी प्रती तोळा ७४ हजार ५०० रुपये असलेले सोने ७ मे रोजी ७० हजार ९०० रुपयापर्यंत खाली घसरले.

भारतीयांना सोन्याचे विशेष आकर्षण आहे. गुंतवणुकीच्या सुरक्षित व खात्रीशीर पर्याय म्हणूनही अनेकजण सोने-चांदीच्या खरेदीकडे वळत आहेत. गत काही महिन्यांत सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. मार्च २०२४ पासून सातत्याने तेजी होती. सोने, चांदीच्या दराने एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यापर्यंत विक्रमी उच्चांकावर मुसंडी मारली होती. गुढीपाडव्याच्या दिवशीदेखील सोन्याचे दर तेजीतच होते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सोने, चांदीच्या दरात घसरण सुरू झाल्याचे दिसून येते. २३ एप्रिल रोजी वाशिमच्या सराफा बाजारात २२ कॅरेट सोने प्रती तोळा ७४ हजार ५०० रुपये तर चांदी ८४ हजार रुपये किलो असे दर होते. यामध्ये जीएसटीचा समावेश नव्हता. ७ मे रोजी सोने प्रती तोळा ७० हजार ९०० तर चांदी प्रती किलो ८२ हजार रुपये असे भाव होते.

१५ दिवसांत भावात घसरण

फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रती तोळा ६२ हजार ९०० रुपये भाव होते. ३१ मार्च २०२४  रोजी ६८ हजार ७०० तर २३ एप्रिल रोजी ७४ हजार ५०० रुपये असा भाव होता. २३ एप्रिलनंतर अवघ्या १५ दिवसांत सोन्याच्या प्रती तोळा भावात ३६०० रुपयांची घसरण होत ७ मे रोजी वाशिमच्या सराफा बाजारात प्रती तोळा ७० हजार ९०० रुपये भाव होते.

दोन दिवसावर अक्षय्य तृतिया..

साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीया या सणाकडे पाहिले जाते. सोने खरेदी, विवाह, गृहप्रवेश, नवीन वस्तू खरेदी यांसारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. अक्षय तृतियाचा मुहुर्त साधण्यासाठी अनेकजण सोने-चांदीचे बुकिंग करीत असल्याचे वाशिम येथील सराफा व्यावसायिक संजय भांडेकर यांनी सांगितले.

Web Title: gold falls by rs 3600 in 15 days booking for akshaya tritiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं