ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई
By Admin | Published: May 16, 2017 06:28 PM2017-05-16T18:28:54+5:302017-05-16T18:28:54+5:30
मानोरा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या शेंदुरजना अढाव, पांचयत समिती गणातील गावामध्ये भिषण पाणी टंचाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : मानोरा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या शेंदुरजना अढाव, पांचयत समिती गणातील रणजीत नगर, पाळोदी, ढेोणी, शेंदुरजना अढाव, उज्वलनगर, आदि गावामध्ये भिषण पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांंना करावा लागत आहे. शेंदुरजना पाणी टंचाई सदृश्य स्थिती असतांना याकडे शासनव प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
शेंदुरजना अढाव पं.स.गणातील ही पाच ते सहा गावे डोंगराळ भागात वसलेली आहेत. त्यामुळे भुजल पातळी अतिशय खोलवर गेलेली आहे. या परिसरात बोअरवेलसारखी यंत्रणा कुचकामी ठरत आहे. गेल्या १४ ते १५ वर्षापुर्वी उज्वलनगर भागातील टेकडी शिवारात तलावाचे कामाला सुरुवात झाली,मात्र अद्यापही त्या तलावाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे फेबु्रवारीपासूनच या डोंगराळ भागामध्ये तीव्र पाणी टंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. एका महिन्यापूर्वी उज्वलनगर येथील नागरिकाना भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. तेव्हा तहसीलदार शेख गावामध्ये पाणी टंचाई पाहणीला गेले असता त्यांना ग्रामस्थांनी घेराव घालुन पाणी समस्या निकाली काढण्याबाबत मागणी केली होती. तेव्हा प्रशासनाच्यावतीने टँकरची व्यवस्था करुन देण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचे समजते. या गावात प्रत्येक वर्षी भिषण पाणी टंचाई भासते . तरी सुध्दा शासन व प्रशासन कायमस्वरुपी पाणी टंचाई समस्या निवारण करण्याकरिता दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांवर पिण्याच्या पाणयासाठी रानोमाळ वणवण भटकंती करण्याची वेळ आलेली आहे.
गेल्या १५ ते २० वर्षापासून उन्हाळ्यात पाणी टंचाई भासते. प्रशासन अखेरच्या महिन्यात तात्पुरती पाण्याची उपाय योजना करुन देण्यात धन्यता मानते. फेबु्रवारीपासून दरवर्षी भिषण पाणी टंचाई उदभवते. पाणी टंचाई समस्येमुळे ग्रामस्थांचा वणवण भटकंती करीत पाणी आणण्यात दिवस जातो. त्यामुळे मजुरी बुडते. परिणामी, पाणी टंचाईने अनेक ग्रामस्थ कुटूंबासह पुणे, मुंबई, सुरत आदि ठिकाणी कामाला जावुन उदरनिर्वाह करतात.त्यामुळे शासनाने कायम स्वरुपी पाणी टंचाई दुर करण्याकरिता उपाय योजना करावी.
-रेखाताई नथ्थु पडवाल
पं.स.सदस्या