हळद पिकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 01:34 PM2017-10-20T13:34:14+5:302017-10-20T13:38:56+5:30
वाशिम: जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे खरीपातील तूर, कपाशीला मोठा आधार मिळाला असला तरी, हळद पिकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. या रोगापासून पिकाचा बचाव करण्यासाठी विविध उपाय करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात मागील काही वर्षांत हळदीची लागवड वाढली आहे. हळद पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. मध्यम पाऊस व चांगल्या स्वच्छ प्रकाशात या पिकाची वाढ उत्तम होते. पाण्याचा ताण व जास्त पाऊसमान हे पीक काही वेळ सहज सहन करू शकते, परंतु जास्त दिवस पिकात पाणी साचून राहणे हानिकारक आहे. तसेच कडक हिवाळा या पिकास मानवत नाही. थंडीमुळे हळदीची पानेवाढ काही अंशी थांबते व जमिनीतील कंदांची (फण्यांची) वाढ होते. कोरडे व थंड हवामान कंद पोषणास अनुकूल असते. सध्या हळदीचे पीक फुलोरा व हळकुंड धरण्याच्या अवस्थेत आहे. यंदा या पिकावर काही प्रमाणात करपा रोगाचा प्रादूर्भाव झाल्याचे दिसत आहे. यामुळे हळद उत्पादक शेतकरी वर्गात थोडे चिंतेचे वातावरणही आहे. त्याच्या नियंत्रणासाठी डायथेम एम-४५ हे पंचवीस ग्रॅम किंवा कॉपर आॅक्सिक्लोराईड प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला कृषी खात्याने दिला आहे.