वाशिम जिल्ह्यात गारपिटीमुळे ८५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 07:38 PM2018-02-12T19:38:15+5:302018-02-12T19:45:31+5:30
वाशिम : अवकाळी पाऊस व गारपिटीने वाशिम जिल्ह्यातील ८५०९ हेक्टरवरील पीक व फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, सोमवार १२ फेब्रुवारीपासून स्थानिक पातळीवरील चमूतर्फे नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्यास प्रारंभ झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अवकाळी पाऊस व गारपिटीने वाशिम जिल्ह्यातील ८५०९ हेक्टरवरील पीक व फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, सोमवार १२ फेब्रुवारीपासून स्थानिक पातळीवरील चमूतर्फे नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्यास प्रारंभ झाला आहे.
जिल्हयात रविवार, ११ फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला. रिसोड व मालेगाव तालुक्यात गारपीटही झाली. मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार परिसरातील अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले. रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारासदेखील वाशिम शहरासह रिसोड व मालेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. यामुळे पीक नुकसानाची व्याप्ती वाढली असून, शेतक-यांना नुकसानभरपाई मिळावी या दृष्टिकोनातून तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांच्यामार्फत नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे केले जात आहेत. गारपिट व अवकाळी पावसामुळे रिसोड व मालेगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून, पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली. प्राथमिक अंदाजानुसार, जिल्ह्यातील ८५०९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, अंतिम अहवाल हाती आल्यानंतर यामध्ये बदलही होऊ शकतो, असे गावसाने यांनी स्पष्ट केले.
लेखी आदेशच नाहीत
दरम्यान, काही ठिकाणच्या तलाठी व कृषी सहायकांना पंचनाम्यासंदर्भात अद्याप लेखी आदेश मिळाले नसल्याची माहिती आहे. लेखी आदेश नसल्याने सोमवारी अनेक ठिकाणी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांनी नुकसानग्रस्त भागांची केवळ पाहणी करण्याचे सोपस्कार पार पाडल्याची माहिती आहे. यासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांना विचारणा केली असता, तालुका स्तरावरून तहसिलदार व तालुका कृषी अधिका-यांकडून सोमवारी सायंकाळपर्यंत लेखी आदेश दिले जातील, असे सांगितले.
मुंगळा परिसरातही प्रचंड नुकसान
मालेगाव तालुक्यातील मूंगळा, खेर्डी, रेगाव परिसरात अवकाळी पाऊस व गारपिटीने गहू, हरभरा, संत्रा पिकांचे अतोनात नुकसान झाले. १२ फेब्रुवारी रोजी मुंगळा परिसराला भेट देऊन कृषी सहायक व तलाठ्यांनी पाहणी केली. मात्र, पंचनामा केला नाही. यासंदर्भात विचारणा केली असता, अद्याप लेखी आदेश मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. लेखी आदेश प्राप्त होताच, पंचनामे केली जातील, असे तलाठी गजानन उमाळे, कृषी सहायक संजय जहागीरदार, भारत लहाने यांनी सांगितले.