पोलिस भरतीचा एकच अर्ज कायम ठेवा; अन्यथा सर्वच बाद होतील
By दिनेश पठाडे | Published: May 10, 2024 05:45 PM2024-05-10T17:45:41+5:302024-05-10T17:46:10+5:30
जिल्ह्यातील ३४२ उमेदवारांना हमीपत्र द्यावे लागणार
दिनेश पठाडे, वाशिम : सन २०२२-२३ या वर्षातील रिक्त असलेल्या पोलिस शिपाई संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकापेक्षा अधिक ठिकाणी उमेदवारांनी अर्ज केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित अर्जदाराला एकाच घटकांसाठी एकच आवेदन अर्ज ग्राह धरण्याबाबतचे आणि इतर आवेदन रद्द करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. अन्यथा सर्वच अर्ज बाद होणार असल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रविणकुमार पडवळ यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील रिक्त असलेल्या पोलिस शिपाई संवर्गातील पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, बँड्समन, सशस्त्र पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई भरती-२०२३ करिता देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. अशी तरतूद करण्यात आली आहे होती, परंतु काही उमेदवारांनी एका पर्यायाकरिता एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एकच ग्राह्य धरून इतर घटकांतील आवेदन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी उमेवादारांकडून हमीपत्र भरून घेतले जात आहेत. ज्या पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीतील उमेदवारांनी एकापेक्षा एक अर्ज भरले आहेत, त्यांना याबाबत कळविण्यात आले आहे.
उमेदवार ज्या पोलिस हद्दीत राहत आहेत, त्या पोलिस अधीक्षक कार्यालयात समक्ष जाऊन फक्त एकाच घटकांसाठी एकच आवेदन ग्राह्य धरण्यात यावा व उर्वरित विविध ठिकाणी सादर केलेले अर्ज रद्द करण्याबाबतचे हमीपत्र स्व-हस्तक्षरात भरून द्यावे लागणार आहे. १७ मेपर्यंत संबंधित पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या मुदतीत सदरची कार्यवाही न केल्यास त्यानंतर त्यांचे सर्व आवेदन अर्ज बाद करण्यात येणार आहेत.
वाशिम जिल्ह्यातील ३४२ जणांचे एकापेक्षा अधिक अर्ज
वाशिम जिल्हा पोलिस दलात रिक्त असलेल्या एकूण ६८ पोलिस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील ३४२ उमेदवारांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकाच घटकांसाठी एकापेक्षा अधिक अर्ज केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्याकडून एकच आवेदन ग्राह्य धरणे व इतर सर्व ठिकाणचे आवेदन रद्द करण्याबाबतचे हमीपत्र भरून घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.