माणिकराव ठाकरे की भावना गवळी : निवडणूक निकालाची उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 02:09 PM2019-05-21T14:09:08+5:302019-05-21T14:11:07+5:30
वाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, २३ मे रोजी दोन दिग्गज उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरविणारे आकडे यंत्रातून बाहेर पडतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, २३ मे रोजी दोन दिग्गज उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरविणारे आकडे यंत्रातून बाहेर पडतील. या निवडणुकीत बाजी कोण मारणार, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे की शिवसेनेच्या भावना गवळी? याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून आहे.
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात जिल्ह्यातील वाशिम व कारंजा या दोन विधानसभा तसेच यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, पुसद या चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या प्रमुख उमेदवारांसह एकूण २४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान झाले असून, गत पंचवार्षिकच्या तुलनेत यावर्षी सव्वा दोन टक्क्याने मतदानात वाढ झाली होती. १९ लाख १४ हजार ७८५ मतदारांपैकी ११ लाख ६९ हजार ८०६ मतदारांनी २२०६ केंद्रांवर मतदानाचा हक्क बजाविला होता. ११ एप्रिल रोजी मतदान झाल्यापासून प्रमुख राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते विजय आपलाच असा दावा करीत आहेत. दुसरीकडे प्रशासन मात्र मतमोजणीच्या तयारीत गुंतले आहे. २३ मे रोजी यवतमाळ येथे मतमोजणी होणार असल्याने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. मतमोजणीच्या एकूण ३० फेऱ्या राहणार आहे. एखाद्याला मतमोजणीदरम्यान आक्षेप नोंदवावयाचा असेल तर त्याला लेखी स्वरुपाचा अर्ज सादर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. दरम्यान, निवडणुक निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली असून वाढीव मते कुणाच्या बाजूने असतील, एक्झिट पोल काय सांगतात, विजयी कोण होणार ठाकरे की गवळी? या चर्चेन मतदारसंघ ढवळून निघत आहे. कार्यकर्त्यांकडून दावे, प्रतिदावे, अंदाजे बांधले जात आहे. प्रमुख लढत ही काँग्रेसचे माणिकराव ठाकरे व शिवसेनेच्या भावना गवळी या दोन उमेदवारांमध्ये झाली असून, दोन्ही बाजूचे कार्यकर्ते सोशल मीडियावर विजयाचे गणित मांडू लागले आहेत. निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. (प्रतिनिधी)