विविध स्पर्धांतून ‘बेटी बचाओ’चा संदेश !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 05:24 PM2017-10-30T17:24:37+5:302017-10-30T17:27:13+5:30
‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा संदेश देण्यासाठी तसेच ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची व्यापक जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून महिला व बालकल्याण विभागातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.
वाशिम - ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा संदेश देण्यासाठी तसेच ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची व्यापक जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून महिला व बालकल्याण विभागातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. १ नोव्हेंबर रोजी तालुकास्तरावर वक्तृत्व स्पर्धा घेतली जाणार आहे.
‘माझी कन्या भाग्यश्री’ या सुधारीत योजनेची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याबरोबरच स्त्री-पुरूष लिंग गुणोत्तरातील तफावत कमी करणे, मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महिला व बालकल्याण विभागातर्फे विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन केले जाते. स्वयंसेवी संस्था, शाळा, विद्यालय व महाविद्यालय या स्तरावर मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांचे संगोपन, शिक्षण, वारसा हक्क, महिला सक्षमीकरण, आदी विषयावर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा चित्ररथ, घोषवाक्ये, पथनाट्य इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे, अशा सुचना वरिष्ठ स्तरावरून मिळालेल्या आहेत. या सूचनांच्या अनुषंगाने १ नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील सहाही बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातर्फे मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांचे संगोपन, शिक्षण, वारसा हक्क, महिला सक्षमीकरण, आदी विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेत भाग घेऊन इच्छूणाºयांना ३१ आॅक्टोबर रोजी रिसोड, वाशिम, मानोरा, कारंजा, मंगरूळपीर व मालेगाव येथील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात नावनोंदणी करावी लागणार आहे. १ नोव्हेंबर रोजी तालुकास्तरावर घेतलेल्या स्पर्धेतून सहा तालुक्यातील प्रत्येक दोन याप्रमाणे एकूण १२ स्पर्धकांची जिल्हास्तरावर निवड केली जाणार आहे. २ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरावर स्पर्धा होऊन या १२ स्पर्धकांमधून २ जणांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाईल. ३ नोव्हेंबर रोजी विभागस्तरीय वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप इंगळे यांनी केले.