मंगरुळपीर येथील नाफेडचे खरेदी केंद्र नावापुरतेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 07:28 PM2017-11-06T19:28:01+5:302017-11-06T19:29:19+5:30
मंगरुळपीर (वाशिम): शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी वारंवार मागणी केल्यानंतर मंगरुळपीर येथे अखेर गत १५ दिवसांपूर्वी नाफेडद्वारे उडिद, मुग आणि सोयाबीनच्या खरेदीसाठी कें द्र सुरू करण्यात आले; परंतु या ठिकाणी अद्याप शेतक-यांकडून सोयाबीनचा एकही दाणा खरेदी करण्यात आलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर (वाशिम): शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी वारंवार मागणी केल्यानंतर मंगरुळपीर येथे अखेर गत १५ दिवसांपूर्वी नाफेडद्वारे उडिद, मुग आणि सोयाबीनच्या खरेदीसाठी कें द्र सुरू करण्यात आले; परंतु या ठिकाणी अद्याप शेतक-यांकडून सोयाबीनचा एकही दाणा खरेदी करण्यात आलेला नाही. सोयाबीनमध्ये ओलावा असल्याच्या नावे, ही खरेदी बंद ठेवण्यात आल्याचे कळले, तर केवळ ५९२ क्विंटल उडिद आणि ४० क्विंटल मुगाची येथे खरेदी होऊ शकली.
यंदा अल्प पावसामुळे शेतक-यांना खरीप हंगामात मोठा फटका बसला. उडिद, मुगासह सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट आली. असे असतानाच बाजारात हमीदरापेक्षा खूप कमी दरात उडिद, मुग आणि सोयाबीनची खरेदी करून शेतक-यांची लुबाडणूक करण्यात येत होती. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना दिलासा मिळावा म्हणून लोकप्रतिनिधींनी शासन, प्रशासनाकडे नाफेडचे केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यासाठी खरेदी विक्री समितीमार्फत शेतक-यांकडील उडिद, मुग आणि सोयाबीनची प्रमाणानुसार नोंदणीही करून घेण्यात आली. शेतक-यांकडील उडिद, मुग संपत आले असताना आणि सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत असतानाही नाफेड केंद्र सुरू करण्याची तसरी घेण्यात आली नाही. अखेर शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या सततच्या पाठपुराव्यानंतर मंगरुळपीर येथे नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले; परंतु गत १५ दिवसांच्या कालावधित येथे केवळ ५९२ क्विंटल उडिद आणि ४९ क्विंटल मुगाची खरेदी झाली; परंतु सोयाबीनच्या खरेदीचा मुर्हूत अद्याप निघालेला नाही. त्यामुळे आता शेतक-यांकडील सोयाबीन अर्धे अधिक संपल्यानंतर पुन्हा व्यापा-यांना संधी देण्यासाठी येथे सोयाबीनची खरेदी सुरू होईल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात संबंधित अधिका-यांकडे चौकशी केली असता सोयाबीनमध्ये ओलावा असल्यामुळे येथे खरेदी सुरू केली नसल्याचा अजब युक्तीवाद त्यांच्याकडून करण्यात आला. याची दखल राज्य शासनाने घेणे अत्यंत गरजेचे आहे.