राष्ट्रीय ग्राहक दिन : ग्राहकांची लूट कधी थांबणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 01:43 PM2018-12-24T13:43:29+5:302018-12-24T13:44:04+5:30

वाशिम : निर्धारीत दरापेक्षा जास्त आकारणी, चिल्लर नसल्याच्या नावाखाली एक-दोन रुपया परत न देणे, चलनबाह्य नाण्यातील किंमती, भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री अशी एक ना अनेक प्रकारे ग्राहकांची आर्थिक व मानसिक लूट होत असल्याचा अनुभव घरातून ग्राहकांना येत आहे.

National Customer Day: When the loot of customers will stop | राष्ट्रीय ग्राहक दिन : ग्राहकांची लूट कधी थांबणार 

राष्ट्रीय ग्राहक दिन : ग्राहकांची लूट कधी थांबणार 

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : निर्धारीत दरापेक्षा जास्त आकारणी, चिल्लर नसल्याच्या नावाखाली एक-दोन रुपया परत न देणे, चलनबाह्य नाण्यातील किंमती, भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री अशी एक ना अनेक प्रकारे ग्राहकांची आर्थिक व मानसिक लूट होत असल्याचा अनुभव घरातून ग्राहकांना येत आहे. विविध वस्तू व सेवांच्या माध्यमातून होणारी आर्थिक लूट कधी थांबणार? असा सवाल ग्राहकांमधून उपस्थित केला जात आहे. 
बाजारपेठेतील राजा म्हणून ग्राहकांकडे पाहिले जाते. मात्र, विविध प्रकारची प्रलोभने, अन्न भेसळ, बनावट वस्तू आदींमुळे हा ‘राजा’च वस्तू, साहित्य खरेदी करताना संभ्रमात पडला आहे. अनेकवेळा फसवणूकही होते. एक वस्तू खरेदी करा आणि दुसरी मोफत मिळवा, अमुक खरेदीवर सोने, चांदीचे नाणे मोफत मिळेल यासह विविध प्रलोभने दाखवून ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढीस लागले असल्याचे दिसून येते. दैनंदिन व्यवहारात भेसळयु्क्त माल मिळणे, कमी प्रतीचा माल मिळणे, वजनमापात फसवणूक, छापील किमतीपेक्षा कमी किंवा जास्त किंमत आकारणे पाहावयास मिळते. ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक कायदा, वजन मापे कायदा, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा असे निरनिराळे बरेचसे कायदे अंमलात आले. मात्र, या कायद्याची अनेक ग्राहकांना माहिती नसते तर अनेकवेळा कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी नाही. त्यामुळे विविध माध्यमातून ग्राहकांची फसवणूक होण्याच्या घटना अद्याप थांबलेल्या नाहीत. 
 
बिलांच्या पावतीलाही खो
वस्तू व पदार्थ्यांच्या किंमतींमधून ग्राहकांची फसवणूक होऊ नये तसेच शासनाचा कर बुडू नये म्हणून प्रत्येक ग्राहकांना बिलाची पावती देणे शासनाने बंधनकारक केले आहे. मात्र, या नियमाची दुकानदार व व्यावसायिकांकडून बºयाच प्रमाणात पायमल्ली होते. मागणी केल्याशिवाय बिल दिले जात नाही, याचा प्रत्यय ग्राहकांना येतो. 
 
अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याचाही धाक नाही
‘अन्ना’शिवाय मानवी शरिरात जीवंतपणाच राहू शकत नाही. अन्नपदार्थांमध्ये भेसळ करून स्वत:ची तुंबडी भरणारी टोळीच सक्रिय झाल्याने मानवी आरोग्य धोक्यात सापडले आहे. कोणत्या क्षेत्रातून पैसा कमवावा याचेही भाव या महाभागांना राहिले नसल्याने ते इतरांना जणू मरणाच्या दारातच नेऊन सोडत आहेत. अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी कायदा करण्यात आला. या कायद्याची अंमलबजावणी करणारा स्वतंत्र विभागही स्थापन झाला. मात्र, या विभागालादेखील ही भेसळ रोखता आली नसल्याचे दिसून येते.
 
वस्तू खरेदी करताना अशी घ्यावी काळजी
१) फसव्या प्रलोभनांना बळी पडू नये.
२) वस्तू खरेदी करताना एमआरपीपेक्षा जास्त रक्कम देऊ नका
३) वस्तूंची खरेदी करताना बिल मागणे हा ग्राहकांचा अधिकार आहे.
४) डबाबंद खाद्य पदार्थांची व्यवस्थित पाहणी करा
५) वस्तू खरेदी करताना ‘एक्सपायरी डेट’ तपासा
६) आॅनलाईन खरेदी करताना सजग राहा
७) काही शंका, तक्रार असेल तर ग्राहक न्यायालय तसेच जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करावी

Web Title: National Customer Day: When the loot of customers will stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.