हगणदरीमुक्त न होणार्या गावांना निधी मिळणार नाही; वाशिम जिल्हा परिषद अध्यक्षांची स्पष्टोक्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 07:24 PM2018-01-11T19:24:09+5:302018-01-11T19:39:40+5:30
नवनिर्वाचित सरपंचांनी गाव हगणदरीमुक्त करून दर्जा कायम ठेवावा. कारण यापुढे गाव हगणदरीमुक्त नसेल तर शासनाचा निधी त्या गावात देणे शक्य होणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गाव हगणदरीमुक्त करणे जेवढे अवघड होते; आता तो दर्जा टिकवून ठेवणे तेवढेच अवघड काम आहे. नवनिर्वाचित सरपंचांनी गाव हगणदरीमुक्त करून दर्जा कायम ठेवावा. कारण यापुढे गाव हगणदरीमुक्त नसेल तर शासनाचा निधी त्या गावात देणे शक्य होणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केले. ११ जानेवारी रोजी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत स्थानिक विठ्ठलवाडी येथे आयोजित नवनिर्वाचित सरपंचांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, संजय मापारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देशमुख यांनी नवनिर्वाचित सरपंचांनी गावाच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी गाव हगणदारीमुक्त करणाºयाना सर्व नागरिकांचे स्वागत केले. नवीन सरपंचांना प्रेरणा देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मार्च २०१८ पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे ध्येय असल्याचे सांगुण पाटील म्हणाले की आतापर्यंत जिल्ह्यातील तीनशे ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. येणा-या २६ जानेवारी रोजी मंगरूळपीर तालूका हगणदरीमुक्त घोषित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हागणदारीमुक्त झालेल्या गावांमध्ये सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचे कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष ठाकरे म्हणाले की, सरपंचांना प्रशिक्षण देणे गरजेचे असून त्यांना विविध योजनांची माहिती देण्यासोबतच तांत्रिक आणि प्रशासकीय ज्ञान देणे गरजेचे आहे. चांगले काम करताना विरोध होतोच पण विरोधामुळे खचून न जाता नव्या जोमाने कामाला लागा असा सल्ला ठाकरे यांनी नवनिर्वाचित सरपंचांना दिला.
या कार्यशाळेत काही सरपंचांचा मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनीही आपले विचार व्यक्त केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर यांनी केले. क्षमता बांधणी सल्लागार प्रफुल्ल काळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुमेर सानेकर, विजय नागे, अभिजीत दुधाटे, पुष्पलता अफुने, अमित घुले, प्रदीप सावळकर, प्रदिप पान्हेरकर, रविचंद्र पडघान, समाधान खरात, आदींनी परिश्रम घेतले.