अंध मतदारासाठी आता ब्रेल लिपी
By Admin | Published: September 17, 2014 01:10 AM2014-09-17T01:10:09+5:302014-09-17T01:10:09+5:30
मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून निवडणूक आयोगाचे एक कृतीशील पाऊल.
वाशिम : मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून जनजागृती करण्यासोबतच कृतीशील पावलं उचलण्यात येत आहे. देशभरातील अंध मतदारासाठी निवडणूक आयोगाने खास ब्रेल लिपीची व्यवस्था केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनच्या बाजूला ब्रेल लिपीमध्ये उमेदवाराचा क्रमांक लिहिण्यात येणार आहे. यामुळे अंध मतदारांना दिलासा मिळाला आहे. गत लोकसभा निवडणूकीत पहिल्यांदा आयोगाने ब्रेल लिपीचा प्रयोग केला होता. त्यावेळी या प्रयोगात आयोगाला यश मिळाल्यामुळेच विधानसभा निवडणूकीतही प्रयोग राबविण्याचा निर्धार निवडणूक आयोगाने केला आहे. अंध मतदारांची समस्या लक्षात घेवून गत लोकसभा निवडणूकीमध्ये प्रत्येक ईव्हीएम मशीनच्या बाजूला ब्रेल लिपिचा वापर करण्यात आला होता. यावेळीही तो प्रयोग केल्या जाणार आहे. मतदान केंद्रावर डमी मतपत्रिका असणार आहे. त्यावर उमेदवाराचा क्रम ब्रेल लिपीमध्ये लिहिलेला राहील. त्याप्रमाणेच मशीनवरील निळ्या बटणाच्या बाजूला ब्रेल लिपीचे न्युमरिक स्टीकर राहणार आहे.