विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी पुढचे सरकार भाजपाचेच - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 03:47 PM2018-09-01T15:47:09+5:302018-09-01T16:24:43+5:30
विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी पुढचे सरकारही भाजपाचेच राहणार असल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे शनिवार, १ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : देशातील काळा पैसा बाहेर यावा, यासाठी भाजपा सरकारने जाहीर केलेला नोटाबंदीचा निर्णय निश्चितपणे यशस्वी झाला. याशिवाय कर चोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी देशभरात ‘जीएसटी’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. मुद्रा, उज्वला, पीकविमा, ग्रामसडक यासारख्या महत्वाकांक्षी योजना राबवून तळागाळातील लोकांचे हित जोपासले जात आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी पुढचे सरकारही भाजपाचेच राहणार असल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे शनिवार, १ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
विद्यमान भाजपा सरकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार असल्याच्या वावड्या विरोधकांकडून उठविल्या जात आहेत; परंतु संविधान बदलण्याच्या नव्हे; तर ते अधिक मजबूत करण्याचा सरकारचा विचार असल्याचे सांगून ना. आठवले पुढे म्हणाले, की भाजपा सरकारने आपल्या कारकिर्दीत ‘अॅॅट्रॉसिटी अॅॅक्ट’ला कुठलाही धक्का बसू दिला नाही. याशिवाय जातीनिहाय आरक्षणाचा विषय देखील सरकार अभ्यासपूर्ण हाताळत आहे. सरकारच्या याच सर्वसामान्यांच्या हितकारी ध्येयधोरणांमुळे ‘आरपीआय’ यापुढेही भाजपासोबतच राहणार असल्याचे ना. आठवले म्हणाले.
कोरेगाव भीमा येथील दंगल, संभाजी भिडे यांची भूमिका, आदिंबाबत छेडले असता, कोरेगाव भीमा येथील दंगल सवर्णांनी घडवून आणल्याचे सांगून त्याच्याशी एल्गार परिषदेचा कुठलाही संबंध नसल्याचे ते म्हणाले. संविधानाला विरोध करून अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारी भूमिका संभाजी भिडे यांनी बाळगली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सातत्याने पुढे रेटली जात आहे. पोलिस प्रशासनाने यादृष्टीने तपास करणे आवश्यक असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, रिपाइं जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांच्यासह ‘आरपीआय’चे पदाधिकारी उपस्थित होते.